दहिसर पूर्व येथे नामांकित दूध कंपन्याच्या पिशवित अशुद्ध पाण्याची भेसळ करून नागरिकांना विकणाऱ्या भामट्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. दहिसर पोलिस ठाण्यातील अधिकारी आणि अन्न व औषध प्रशासन, बृहन्मुंबई महाराष्ट्र शासन येथील अन्न सुरक्षा अधिकारी यांच्या संयुक्त कारवाईत हा भामटा पकडला गेला आहे.
दहिसर पोलिसांना विश्वसनीय सुत्रांकडून माहिती प्राप्त झाली की त्यांच्या हद्दीतील वीर संभाजी गुरूद्वारासमोर काही लोक नामांकित दूध कंपनीच्या पिशवीत अशुद्ध पाणी मिसळून ते नागरिकांमध्ये वितरीत करत आहेत. याबाबत शहानिशा करण्याची तयारी पोलिसांनी केली होती. त्यानंतर याची पक्की माहिती मिळाल्यावर दहिसर पोलिस कक्ष-१२ आणि अन्न सुरक्षा अधिकारी यांनी एकत्रितपणे माहिती मिळालेल्या जागी छापा टाकला.
हे ही वाचा:
महाराष्ट्र पोलिसांमुळेच वाचले, ३० कोटी अन् बिल्डर जितू पटेल
प्रत्येक आरोपीचा बचाव करण्याचा ठाकरे सरकारचा अट्टाहास का?
सचिन वाझे प्रकरणात आता एका महिलेची एंट्री
या छाप्यात, अमुल सारख्या नामांकित कंपनीच्या गोल्ड आणि ताजा दोन्ही पिशव्या थोड्या कापून त्यातून थोडे दूध बाहेर काढले जात होते. त्यानंतर त्या पिशव्यांत अत्यंत हानिकारक अशा अशुद्ध पाण्याची भेसळ केली जात होती आणि मग त्या पिशव्या पुन्हा एकदा स्टोव्ह पिन व मेणबत्तीच्या सहाय्याने सील केली जात होती. सदर इसमाला रंगे हाथ पकडण्यात पोलिसांना यश आले होते. पकडण्यात आलेल्या आरोपीचे नाव सैदुल नरसिम्म कावेरी असल्याचे उघड झाले.
या इसमाकडे अंदाजे ₹५,९३०/- किंमतीचे १२२ लिटर दूध मिळाले जे जागीच नष्ट करण्यात आले. या इसमाविरूद्ध भारतीय दंडविधान संहितेच्या २७२, ४८२, ४८३, ४२० अशा विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईमध्ये प्रभारी पोलीस निरीक्षक महेश तावडे, पोलीस निरीक्षक सचिन गवस, पोलीस उपनिरीक्षक हरिष पोळ, सुनिल बिडये, कल्पेश सावंत, महिला पोलीस अंमलदार सुनिता भेकरे यांच्यासह इतर काही अधिकारी आणि हवालदार यांनी मोलाची भूमिका बजावली. त्याबरोबरच अन्न सुरक्षा अधिकारी एस. एस. क्षिरसागर व त्यांचे पथक यांची देखील साथ लाभली.