प्रसिद्ध उद्योगपती आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांना पुन्हा एकदा धमकीचा ईमेल आल्याची माहिती आहे. यापूर्वी मुकेश अंबानी यांना धमकीचे दोन ईमेल आले होते. त्यात २०० कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती. परंतु, अंबानी यांनी त्याच्या ईमेलला उत्तर न दिल्यामुळे आरोपीने आता तिसरा मेल पाठवत त्यांच्याकडे ४०० रुपयांच्या खंडणीची मागणी केली आहे.
अंबानींच्या अधिकृत आयडीवर पाठवलेल्या तिसऱ्या ईमेलमध्ये लिहिले आहे की, “तुमची सुरक्षा कितीही चांगली असली तरीही आम्ही तुम्हाला मारू शकतो. यावेळी किंमत ४०० कोटी रुपये आहे आणि पोलीस आमचा तपास करुन अटक करू शकत नाहीत.” असेही या धमकीच्या ई-मेलमध्ये म्हटले आहे.
धमकीचे गांभीर्य लक्षात घेऊन मुंबई पोलिसांनी सोमवारी अंबानी यांच्या दक्षिण मुंबईतील निवासस्थानी (अँटिलिया) सुरक्षा वाढवली आहे. अंबानी यांना धमकीचा पहिला ईमेल २६ ऑक्टोबर रोजी आला होता. यामध्ये धमकी देणाऱ्या व्यक्तीने २० कोटी रुपयांची मागणी केली होती. नंतर दुसरा ईमेलही आला आणि त्यात २०० कोटी रुपयांची मागणी करण्यात आली. पैसे न दिल्यास मुकेश अंबानींना गोळ्या घालू, असेही धमकीच्या मेलमध्ये नमूद केले आहे.
हे ही वाचा..
रोहित शर्माच्या यशस्वी कर्णधारपदाचे रहस्य
पाकिस्तानला गोपनीय माहिती देणाऱ्याला राजस्थानमधून अटक
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून दोन खासदारांनंतर आमदाराचा राजीनामा
मराठी नवउद्योजकांनी व्यावसायिक यशासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा फायदा करुन घ्यावा
देशातील सर्वात मोठे उद्योगपती यांना आलेल्या धमकीच्या ईमेलमुळे उद्योग जगतात खळबळ उडाली असून तपास यंत्रणेला अलर्ट करण्यात आले आहे. गावदेवी पोलीस, मुंबई गुन्हे शाखा, सायबर गुन्हे शाखा, महाराष्ट्र सायबर सेल आणि केंद्रीय तपास यंत्रणेने या ईमेल ची माहिती काढण्यास सुरुवात केली असून ईमेल कर्त्याचा कसून शोध घेण्यात येत आहे.