काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात सध्या काँग्रेसची भारत न्याय जोडो यात्रा सुरू आहे. ही यात्रा आता महाराष्ट्रात दाखल झाली आहे. दरम्यान काही शहरांमध्ये राहुल गांधी यांचा रोड शो देखील सुरू आहे. अशातच नाशिक येथे गुरुवार, १४ मार्च रोजी रोड शो काढण्यात आला होता. या रोड शोदरम्यान झालेल्या गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी मात्र हात धुवून घेतले आहेत. अनेकांची पाकिटे, मोबाईल, दागिने लंपास करण्यात आले आहेत. सुमारे पावणेचार लाख रुपयांपर्यंत ऐवजांची चोरी या रोड शो दरम्यान झाली आहे.
काँग्रेसतर्फे ‘भारत जोडो न्याय यात्रे’त गुरुवारी दुपारी द्वारका ते शालिमार या दरम्यान राहुल गांधी यांच्या रोड शोचे आयोजन करण्यात आले होते. प्रमुख चौकात ठिकठिकाणी काँग्रेसचे पदाधिकारी आणि समर्थक स्वागतासाठी जमले होते. रोड शोचा शालिमार येथे समारोप झाला. या ठिकाणी राहुल गांधी यांची चौकसभा झाली. रोड शोचा मार्ग आणि चौकसभेच्या ठिकाणी गर्दी होती. या गर्दीचा फायदा काही चोरट्यांनी घेतल्याचे उघड झाले आहे.
हे ही वाचा:
अनेक कुलकर्णी मुंबई संघात येतील पण धवल कुलकर्णी सारखे कोणी नाही
लोकसभा निवडणुकीच्या तारखा उद्या होणार जाहीर!
सर्वेक्षणानुसार एनडीए ४०० पार करणार!
कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्यावर गुन्हा दाखल
या प्रकरणी बांधकाम व्यावसायिक पुरवठादार राजू कापसे यांनी तक्रार दिली आहे. राजू कापसे हे स्वतः रोड शोमध्ये सहभागी झाले होते. द्वारका भागात चोरट्यांनी त्यांच्या खिशातील पाकीट लंपास केले. दरम्यान, द्वारका ते शालिमार या भागात काहींचे मोबाईल फोन चोरीला गेले तर कुणाच्या खिशातून पैसे गायब झाले. काहींचे दागिनेही लंपास झाले. रोड शोमध्ये एकूण तीन लाख ६३ हजारांहून अधिकचा ऐवज लंपास झाल्याची माहिती आहे. यात दागिने, मोबाईल आणि रोकडचा समावेश असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.