अंबरनाथच्या एमआयडीसीत चोरट्यांचा सुळसुळाट

अंबरनाथच्या एमआयडीसीत चोरट्यांचा सुळसुळाट

अंबरनाथमधील आनंदनगर एमआयडीसीत गेल्या दीड वर्षांत गुन्ह्यांची नोंद वाढली आहे. एमआयडीसीतील कंपन्यांमधील साहित्य चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. वाढत्या गुन्ह्यांच्या संख्येमुळे एमआयडीसीतील उद्योजक हैराण झाले आहेत. ३५ हजार कोटींची उलाढाल इथून होत असते त्यामुळे या ठिकाणी पोलिसांची सुरक्षा वाढवण्याची मागणी उद्योजकांकडून आणि अंबरनाथ ऍडिशनल मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन (आमा) संघटना करत आहे.

आनंदनगर एमआयडीसीत आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय अशा एक हजार कंपन्या आहेत. मात्र पोलीस सुरक्षा, रस्ते आणि स्वच्छता अशा मुलभूत सुविधा नसल्यामुळे उद्योजक त्रस्त झाले आहेत. या भागात लहान मोठ्या कंपन्यांमधील साहित्याची चोरी केली जाते. विशेषतः इंजिनियरिंग कंपनीमधील यंत्रांचे भाग, तांबे, वायर अशा वस्तु चोरटे लंपास करत असल्याच्या तक्रारी उद्योजकांनी केल्या आहेत.

हे ही वाचा:

मद्यालय चालू, देवालय बंद

लोकसंगीताला अधिक उजळवणार पवनदीप

आता या माध्यमातून अमेरिकेची तालिबानवर कारवाई?

अश्रफ घनी यांच्यानंतर ‘या’ महत्वाच्या व्यक्तीनेही देश सोडला

एमआयडीसीच्या भागात ४१ किलोमीटर अंतर्गत रस्ते असून अनेक भागात पथदिवे नाहीत. रात्रीच्या अंधाराचा फायदा चोरटे घेत असतात. अनेक चोरीच्या घटनांमध्ये सुरक्षा रक्षकांना बांधून ठेऊन मग त्या कंपनीमध्ये चोरी केली जाते. एमआयडीसीतील सुरक्षेबाबत नुकतीच ‘आमा’ संघटना आणि ४० उद्योजकांची बैठक पार पडली. कंपनीचा परिसर आणि मुख्य रस्ता व्यापला जाईल असे सीसीटीव्ही लावण्याचे आदेश बैठकीत दिल्याचे ‘आमा’ चे अध्यक्ष उमेश तायडे यांनी सांगितले. पोलिसांची गस्त वाढवण्यासाठी पोलिसांना एक चार चाकी वाहन खरेदी करून देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

पोलिसांकडून नियमित पेट्रोलिंग होत असते. मात्र कंपन्यांनीही सीसीटीव्ही बसवणे आणि जबाबदार सुरक्षा रक्षक नियुक्त करण्याची गरज आहे. एमआयडीसीतील अनेक गुन्ह्यांचा तपास करून आरोपींना अटक केली आहे. कंपनींनाही वारंवार सूचना करूनही त्यांच्याकडून दुर्लक्ष केले जाते त्यात सुधारणा होणे आवश्यक आहे, असे सहाय्यक पोलीस आयुक्त विनायक नराळे यांनी सांगितले.

Exit mobile version