सोळा वर्षांपासून फरार असलेला आरोपी सोन्याच्या दातांमुळे पोलिसांच्या जाळ्यात अडकला असून मुंबई पोलिसांच्या रफी किडवाई मार्ग पोलिसांनी या आरोपीच्या गुजरातच्या कच्छ येथून त्याच्या मुसक्या आवळल्या आहे.
प्रवीण जडेजा (३८) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. प्रवीण जडेजा याला १६ वर्षांपासून एका गुन्ह्यात जामीन मिळाला होता. जामिनावर बाहेर पडताच तो फरार झाला होता, स्वतःची ओळख लपवून तो गुजरातच्या कच्छ येथील एका गावात राहत होता. त्याने त्याचे नाव प्रवीण ऐवजी प्रविणसिंह उर्फ प्रदीपसिंह आसुभा जडेजा नावाने वास्तव्यास होता. १६ वर्षांपूर्वी प्रवीण जडेजा हा दादर हिंदमाता या ठिकाणी एका कापडाच्या दुकानात कामाला होता. त्या ठिकाणी त्याने मालकाची आर्थिक फसवणूक करून चोरी झाल्याचा बनाव रचला होता. मात्र त्याचा हा बनाव पोलिसांनी उघड करून त्याला अटक केली होती.
हे ही वाचा:
महाराष्ट्र बॉक्सिंग संघटनेत आरोप प्रत्यारोपांची ठोसेबाजी
प्रणिती शिंदे रोहित पवारांना ओळखेनाशा झाल्या
रोहित पवार म्हणाले, शेअर बुडवणे हाच हिंडेनबर्गचा धंदा; अदानी रोजगार देण्यात अग्रेसर
मी दाऊदी बोहरा समाजाचाच एक सदस्य…नरेंद्र मोदी
या गुन्ह्यात त्याला जामीन मिळाल्यावर त्याने कोणाला काही माहिती न देता तो फरार झाला होता. न्यायालयात तारखेला हजर राहत नसल्यामुळे न्यायालयाने त्याच्या विरोधात अटक वॉरंट जारी केले होते. त्याचा शोध घेऊन अटक करण्याचे आदेश न्यायालयाने पोलिसांना दिले होते.
रफी अहमद किडवाई मार्ग पोलीस त्याचा शोध घेत होते मात्र त्याचा कुठलाही थांगपत्ता लागत नव्हता तो कुठे राहतो कुठल्या नावाने राहतो याची काही माहिती पोलिसांना मिळत नव्हती. मात्र आरोपी प्रवीण जडेजा याचे पुढचे दोन दात सोन्याचे असून दोन्ही दातात फट पडल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसानी खबरीची मदत घेत प्रवीण जडेजा हा गुजरात राज्यातील कच्छ येथे एका गावात राहत असल्याची माहिती मिळाली होती. पोलिसांनी प्रवीण जडेजा उर्फ प्रविणसिंह उर्फ प्रदीपसिंह आसुभा जडेजा याची खात्री करून त्याला जीवनविमा पॉलिसी मॅच्युअर झाली असल्याच्या बहाण्याने मुंबईत बोलावून त्याला अटक करण्यात आली.