भुवनेश्वरमधील गोपीनाथ मंदिरातून एका व्यक्तीने नऊ वर्षांपूर्वी दागिने चोरले होते. मात्र त्याने सोमवारी माफीनाम्यासह या मौल्यवान वस्तू परत केल्या. मे २०१४मध्ये या दागिन्यांची चोरी केल्यापासून मला प्रत्येक मिनिटाला पश्चाताप होत असल्याची कबुली त्याने दिली आहे.
इंग्रजीत लिहिलेल्या या चिठ्ठीत ‘मी माझे नाव, पत्ता किंवा गाव नमूद करत नाही,” असे लिहिले आहे. दागिन्यांनी भरलेली ही बॅग मंदिराजवळील घराबाहेर सोडण्यात आली होती. या बॅगेत फेटा, कानातले, बांगड्या आणि बासरी होती. हे सर्व दागिने कृष्ण आणि राधा यांचे होते आणि त्यांची किंमत लाखोंच्या घरात होती. चोराने घेतले त्यापेक्षा जास्त परत दिले. त्याने ३०१ रुपयेही बॅगेत सोडले होते. २०१ रुपये दक्षिणा म्हणून दिले आणि १०० रुपये दंड म्हणून.
‘मंदिरात यज्ञ सुरू असताना मी दागिने घेतले होते. नऊ वर्षांच्या आयुष्यात मला अनेक समस्यांचा सामना करावा लागला. म्हणून, मी ठरवले, दागिने परत करायचे,’ असे या चिठ्ठीत लिहिले होते.
हे ही वाचा:
अन्य धर्मीयांचा त्र्यंबकेश्वर मंदिर प्रवेश गंभीर, एसआयटी नेमणार
उमेदवार मृत्यूमुखी पडली, पण मतदारांनी निवडून आणले
उत्तराखंडमध्ये ३०० हून अधिक बेकायदा मझार जमीनदोस्त
‘जीना यहाँ, मरना वहाँ’ म्हणत न्यायाधीशांनी दिला निरोप
‘चोरी झाल्यानंतर आम्ही पोलिसात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी मंदिरात येऊन तपास केला होता. स्थानिक लोकांची आणि जवळच्या गावातून यज्ञ करण्यासाठी आलेल्या काही पुजाऱ्यांचीही पोलिसांनी चौकशी केली. परंतु ना त्यांना दागिने मिळाले ना चोर,’ असे स्थानिक रहिवासी सुकांता मोहंती यांनी सांगितले. तर, पुजारी कैलाश पांडा यांनी या प्रसंगाला ‘चमत्कार’ म्हणून संबोधले. ‘इतकी वर्षे चोर पकडण्यात पोलिसांना अपयश आल्याने आम्ही आशा सोडली होती,’ असे ते म्हणाले.