कवी पद्मश्री नारायण सुर्वे यांच्या घरात चोरी झाली पण चोराने चोरी केलेले सर्व सामान परत केल्याची माहिती समोर आली. विशेष म्हणजे या चोराने एक चिठ्ठी लिहित सुर्वे कुटुंबीयांची माफी मागितली आहे.
नारायण सुर्वे यांचे नेरळ येथे घर आहे. गंगानगर परिसरात असलेल्या त्यांच्या या घरात सध्या त्यांच्या कन्या सुजाता आणि जावई गणेश घारे राहतात. घारे दाम्पत्याने सुर्वे यांच्या सर्व स्मृती या घरात जपून ठेवल्या आहेत. घारे दाम्पत्य हे दहा दिवसांसाठी त्यांच्या मुलाकडे विरार येथे राहायला गेले होते. बंद घर पाहून चोराने घराच्या शौचालयाची खिडकी फोडून सुर्वे यांच्या घरात प्रवेश केला. मात्र, घरात कोणतेही दागिने, पैसे चोराला सापडले नाहीत. त्यामुळे चोराने घरातील एलईडी टीव्ही, तांब्या-पितळ्याच्या वस्तू, भांडी लुटण्यास सुरुवात केली. सलग दोन-तीन दिवस चोर घरातील साहित्यावर डल्ला मारत होता.
या दरम्यान, चोराला घराच्या भिंतीवर नारायण सुर्वे यांचा फोटो दिसला. शिवाय आसपास त्यांना मिळालेली मानपत्रे, स्मृतीचिन्हे, पुरस्कारही दिसले. यानंतर आपण चोरी करत असलेले घर हे नारायण सुर्वे यांचे असल्याचे चोराला समजले आणि त्याला त्यानंतर आपल्या कृतीचा पश्चाताप झाला. आपल्या चुकीची उपरती झालेल्या या चोराने घरातील सगळ्या वस्तू पुन्हा आणून ठेवल्या. एलईडी टीव्हीही त्याने पुन्हा घरात आणून ठेवत सोबत एक चिठ्ठी लिहित मनातील भावना व्यक्त केल्या.
हे ही वाचा:
काँग्रेसचे हिरामण खोसकर नाना पटोलेंवर संतापले!
विकासशील इंसान पार्टीचे प्रमुख मुकेश साहनी यांच्या वडिलांची हत्या
डोंबिवलीहून पंढरपूरकडे निघालेल्या बसचा अपघात; पाच भाविकांचा मृत्यू
विशाळगडावरील दर्ग्यावर कारवाई करा, शस्त्रसाठा जप्त करा
चोराने चिठ्ठीत म्हटलं आहे की, “मला माहिती नव्हते की, नारायण सुर्वे यांचे घर आहे, नाही तर मी चोरी केली नसती. मला माफ करा. मी, जी वस्तू तुमची घेतली आहे ती मी परत करत आहे. मी टीव्ही पण नेला होता परंतु आणून ठेवला. सॉरी…” या चोरीच्या प्रकरणी नेरळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. चोराने आणून ठेवलेल्या वस्तूंवरील बोटांचे ठसे, सीसीटीव्ही यांच्या आधारे तपास सुरू असल्याची माहिती नेरळ पोलिसांनी दिली आहे.