आंध्र प्रदेशातील पूर्व गोदावरी जिल्ह्यातील एका मंदिरातून चोरी झाली आहे. या चोरीबद्दल मोठ्या प्रमाणात राग व्यक्त केला जात आहे. या घटनेनंतर आंध्र प्रदेशातील भाजपाने या घटनेबद्दल संताप व्यक्त केला आहे.
पूर्व गोदावरी जिल्ह्यातील चालुक्य कालीन गोलिंगेश्वर स्वामी मंदिरातील नंदी चोरीला गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना १० ऑगस्ट रोजी उघडकीस आली. हाती आलेल्या प्राथमिक माहितीनुसार मंदिर प्रशासन आणि केंद्रीय पुरात्त्व विभागाने या विरोधात बिक्कावोलू पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
प्राथमिक तपासात पोलिसांच्या हाती एक सीसीटीव्ही फुटेज लागले आहे. या फुटेजमद्ये ७ आणि ८ ऑगस्टच्या रात्री मंदिराच्या भिंतीवरून एक व्यक्ती उडी मारून येताना आणि नंतर मुर्ती चोरून नेताना आढळला आहे. मंदिरात येणाऱ्या काही भक्तांनी जेव्हा मंदिर प्रशासनाकडे नंदी नसल्याची तक्रार केली तेव्हा ही घटना उजेडात आली.
हे ही वाचा:
विनेश फोगाटवर केली ‘ही’ मोठी कारवाई
सावधान! रस्त्यावर थुंकणाऱ्याला करावी लागणार सेवा
लोकसभेचे कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित
पूर्व गोदावरी जिल्ह्यातील बिकावोलू येथील गोलिंगेश्वर स्वामी मंदिर चालुक्यांच्या काळात बांधलं गेलं आहे. हे मंदिर काकिनाडाच्या पूर्वेस ३३ किमीवर स्थित आहे. हे मंदिर सुंदर गणेश मुर्तींच्या कोरीवकामासाठी प्रसिद्ध आहे.
या घटनेनंतर भाजपाचे नेते विष्णु वर्धन रेड्डी यांनी मुख्यमंत्री रेड्डी यांच्यावर केवळ ख्रिश्चन आणि मुस्लिम यांचा अनुनय केल्याचा आणि हिंदुंचे संरक्षण करण्यात अपयशी ठरल्याचा आरोप केला आहे.
रेड्डी यांनी सांगितले की जेव्हापासून वायएसआर काँग्रेसचे सरकार सत्तेत आले आहे, तेव्हापासून अनेक ठिकाणी हिंदु मंदिरांवर आणि रामतीर्थम् किंवा अंतर्वेदी मुर्तींवर हल्ले झाले आहेत. दुर्दैवाने हे सरकार हिंदुंच्या संस्कृतीचे रक्षण करण्यास संपूर्णपणे असमर्थ ठरले असून ते केवळ ख्रिश्चन आणि मुस्लिम लांगूलचालनात मग्न आहे.
जानेवारी महिन्यात रामतीर्थम् मंदिरातील ४०० वर्ष जुनी रामाची मुर्ती काही लोकांकडून उध्वस्त करण्यात आली आहे. त्यानंतर राजमुंद्री जिल्ह्यातील विघ्नेश्वर मंदिरातील सुब्रमण्यम स्वामी यांची मुर्ती देखील भग्न अवस्थेत आढळली होती.