‘बँक कर्मचारीचं निघाले चोर, लंपास केले ४२ लाख रुपये!

पोलिसांकडून आरोपींना अटक

‘बँक कर्मचारीचं निघाले चोर, लंपास केले ४२ लाख रुपये!

मध्यप्रदेशातून एक चोरीची विचित्र घटना घडली आहे.बँकेच्या कर्मचाऱ्यांनी बँकेवर दरोडा टाकून तब्बल ४२ लाख रुपये लंपास केल्याचे समोर आले आहे.पोलिसांनी या घटनेची कसून चौकशी केली असता बँकेतील तीन कर्मचाऱ्यांनी चोरी केल्याचे उघड झाले आहे.पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले असून चोरी झालेली बँकेतील रोकड तिघांकडून जप्त करण्यात आली आहे.दरम्यान, या घटनेने सर्वच आश्चर्यचकित झाले आहेत.

मध्यप्रदेशातील दमोह जिल्ह्यातील फतेहपूर गावातील मध्यांचल ग्रामीण बँकेमध्ये ही घटना घडली.मिळालेल्या माहितीनुसार, बँकेच्या सुरक्षा गार्डने बँकेत चोरी झाल्याची माहिती मंगळवारी (१४ मे) रात्री ८ च्या सुमारास पोलिसांना दिली.घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.यावेळी बँकेकडे जाणाऱ्या रस्त्यावर पोलिसांना पैशाचे बंडल मिळाले होते.पोलिसांनी घटनास्थळी जाऊन चौकशी केली असता ४२ लाखांहून अधिकची रक्कम लुटल्याचे आढळून आले.मात्र, जेव्हा आरोपींबाबत माहिती समोर आली तेव्हा सर्वांनाच धक्का बसला.वास्तविक बँकेच्या तीन कर्मचाऱ्यांनी मिळून या दरोड्याची योजना आखल्याचे समोर आले.विशेष म्हणजे या योजनेचा मुख्य सूत्रधार दुसरा कोणी नसून पोलिसांना चोरीची माहिती देणारा बँकेचा सुरक्षा गार्डच होता.या प्रकरणी तिघांना पोलिसांनी अटक केली आहे.यामध्ये रोखपाल, सुरक्षा गार्ड आणि अन्य एक कर्मचाऱ्याचा सहभाग आहे.या तिघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

हे ही वाचा:

महादेव बेटिंग ऍप प्रकरणी पुण्याच्या नारायणगावातून पोलिसांनी ७० जणांना घेतलं ताब्यात

‘मोदींसारखा नेता पाकिस्तानलाही मिळावा’

चिनी फंडिंगचे आरोप असलेल्या ‘न्यूज क्लिक’च्या संपादकांची अटक अवैध

सचिन तेंडुलकरच्या सुरक्षारक्षकाने गोळी झाडून केली आत्महत्या!

या संदर्भात दमोहचे पोलीस अधीक्षक श्रुतकिर्ती सोमवंशी यांनी सांगितले की, चोरीच्या गुन्ह्या प्रकरणी बँकेत काम करणाऱ्या तिघांना अटक केली आहे.बँकेत चोरी होत असताना हे तिघेही बँकेत उपस्थित होते.संपूर्ण प्रकरणाची चौकशी करताना तिघांचा जबाब नोंदवण्यात आला.मात्र, या तिघांच्या जबाबात वेगळेपणा दिसून आला.तसेच बँकेतील सीसीटीव्ही देखील बंद असल्याचे आढळून आहे.त्यामुळे तिघांची कसून चौकशी केल्यावर चोरी केल्याची कबुली त्यांनी दिली.तसेच पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी बँकेपासून थोड्याच अंतरावर रस्त्यावरील ओढ्यात पैसे टाकले होते.हेच पैसे पोलिसांना सुरवातीला मिळाले होते.पोलिसांनी सांगितले की, बँकेतून चोरी झालेली ४२ लाख रोकड आरोपींकडून जप्त केली आहे.तिघांनाही ताब्यात घेण्यात आले असून या प्रकरणी अधिक तपास सुरु आहे.

Exit mobile version