कुख्यात गुंड आतिक अहमद याचा भाऊ अशरफचा मेव्हणा अब्दुल समद उर्फ सद्दाम याच्या चौकशीदरम्यान अशरफच्या बेनामी संपत्तीचे गूढ उकलले आहे. अनेक वर्षे त्याचे खजिनदाराचे काम करणाऱ्या सद्दाम याने याबाबत पोलिसांना माहिती दिली आहे. तसेच, बहीण जैनब हिने कुठे जमीन आणि घरे घेतली आहेत, या जमिनी कोणाच्या नावावर घेतल्या आहेत, याबाबतही त्याने सांगितले आहे. अशरफच्या अवैध कमाईतून त्याने स्वत: अनेक जमिनी आणि घरे खरेदी केल्याचेही सांगितले.
आतिक-अशरफ आणि आयएस-२२७ टोळीच्या गुंडांच्या अवैध संपत्तीवर कारवाई करणारे पोलिस आणि ईडीला या माहितीची खूप मदत होणार आहे. एसटीएफने सद्दामने दिलेली माहिती प्रयागराज पोलिसांना दिली आहे. सद्दामकडून जैनब आणि शाइस्ता परवीन यांच्याबाबतही अधिक माहिती विचारण्यात आली आहे.
गेल्या काही वर्षांपासून सद्दाम अशरफचा अवैध व्यवसाय सांभाळत होता. अशरफ बरेली तुरुंगात कैद होता, तेव्हा सद्दामही त्याचा बाडबिस्तारा गुंडाळून बरेलीत पोहोचला. न्यायालयातील सुनावणीदरम्यान सद्दाम आलिशान गाड्यांमधून येत असे.
बरेली तुरुंगात अशरफला सुविधा पुरवण्यासाठी सद्दामने लाखो रुपयांची लाच दिली होती. गेली अनेक वर्षे सद्दाम हा अशरफचा खजिनदार होता. कोणती जमीन खरेदी करायची आहे, कोणती जमीन कोणत्या दराने विकायची आहे, हे सर्व सद्दामच ठरवत असे. अशरफच्या नावावर वसूल केली जाणारी रक्कमही सद्दामकडूनच पोहोचत असे. उमेश पाल हत्याकांडाप्रकरणात सद्दामच्या सहभागाचा प्रयागराज पोलिस तपास करत आहेत. बरेलीच्या तुरुंगात अशरफची गाठभेट घडवण्यासाठी सद्दामच मारेकऱ्यांना घेऊन जात होता.
हे ही वाचा:
तरुणाने आत्महत्येचे पर्याय शोधण्याचा प्रयत्न केला आणि पोलिसांनी त्याला हेरले!
कॅनडामध्ये प्रवेश मिळालेले तब्बल छत्तीस हजार विद्यार्थी चिंतेत
हरित क्रांतीचे जनक एमएस स्वामीनाथन यांचे निधन!
आतिकचा दुबईमध्येही फ्लॅट?
गुंड आतिक किंवा अशरफचा दुबईमध्येही फ्लॅट असल्याची चर्चा सध्या रंगली आहे. मात्र याबाबत पोलिसांना अद्याप पुरावे मिळालेले नाहीत. सद्दाम आतापर्यंत तीनवेळा दुबईला गेला आहे. त्यामुळे आत दुबईतील फ्लॅटसंदर्भात माहिती जमा केली जात आहे.