किशोरी पेडणेकरांच्या डोक्यावर अटकेची टांगती तलवार कायम

अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळला

किशोरी पेडणेकरांच्या डोक्यावर अटकेची टांगती तलवार कायम

मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. बॉडी बॅग खरेदीत घोटाळा प्रकरणी किशोरी पेडणेकर अडचणीत आल्या असून मुंबई सत्र न्यायालयाने त्यांना या प्रकरणी दिलासा देण्यास नकार दिला. त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला आहे. त्यामुळे किशोरी पेडणेकरांच्या डोक्यावर अटकेची टांगती तलवार कायम असणार आहे.

मुंबई महानगरपालिकेत करोना काळामध्ये मृतदेह ठेवण्याच्या बॉडी बॅग खरेदीमध्ये भ्रष्टाचार झाल्याचे प्रकरण समोर आले होते. याप्रकरणी किशोरी पेडणेकरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांनी अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी न्यायालयात धाव घेतली होती. पण, त्यांना दिलासा मिळाला नाही.

करोना काळात मृतदेह ठेवण्यासाठी झालेल्या बॅग खरेदीत भ्रष्टाचार झाल्याप्रकरणी किशोरी पेडणेकर यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणात त्यांच्यांसह ठेकेदार कंपनी असलेल्या वेदांताच्या संचालकांचाही समावेश आहे.

प्रकरण काय?

भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी काही दिवसांपूर्वी करोना काळात मुंबई महापालिकेत कोट्यवधी रुपयांचा कथित घोटाळा झाल्याचा आरोप केला होता. किशोरी पेडणेकर यांच्यावर बॉडी बॅग खरेदीत घोटाळा केल्याचा आरोप करण्यात आला होता. याप्रकरणी किशोरी पेडणेकर यांच्याविरोधात मुंबईतील आग्रीपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. किशोरी पेडणेकर यांच्यासोबतच महानगरपालिकेच्या दोन अधिकाऱ्यांविरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हे ही वाचा:

हिंडेनबर्गच्या अहवालादरम्यान अदानी शेअर्सच्या शॉर्ट सेलिंगमुळे १२ कंपन्या नफ्यात

मद्य धोरण योजेनातील आरोपीकडून लाच घेणाऱ्या ईडी अधिकाऱ्याला अटक

२८ फुटी नटराज मूर्तीचा अडीच हजार किमी प्रवास

प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूकीत महाराष्ट्र अव्वल

मुंबईत मृत करोना रुग्णांना वाहून नेण्यासाठी वापरण्यात येणारी बॉडी बॅग २ हजार रुपयांऐवजी ६ हजार ८०० रुपयांना खरेदी केल्याचे ईडीने म्हटले आहे. हे कंत्राट तत्कालीन महापौरांच्या सूचनेनुसार देण्यात आल्याचा आरोप ईडीने केला होता.

Exit mobile version