राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांच्या अडचणीत आता वाढ होण्याची शक्यता आहे. नारकॉटिक्स कंट्रोल ब्यूरोने (एनसीबी) समीर खान याचा जामीन रद्द व्हावा म्हणून शुक्रवारी ३१ डिसेंबर रोजी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर उच्च न्यायालयाकडून लवकरच सुनावणी होणार असल्याची अपेक्षा असल्याचे एनसीबीच्या सूत्रांनी म्हटले आहे.
मंत्री नवाब मलिक यांचे जावई समीर खान, राहिला फर्निचरवाला आणि करण सजनानी यांना गेल्यावर्षी जानेवारी महिन्यात एनसीबीने ड्रग्ज प्रकरणी अटक केली होती. यांच्याकडून मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित पदार्थ सापडल्याचा दावा एनसीबीने केला होता. त्यानंतर तब्बल ९ महिने तुरुंगात काढल्यानंतर समीर खान, करण सजनानी आणि राहिला फर्निचरवाला यांना सप्टेंबर महिन्यात प्रत्येकी १ लाख, ५० हजार आणि ४० हजार रुपयांच्या जामिनावर सोडण्यात आले होते.
हे ही वाचा:
‘२०१७ चे वचन पूर्ण करायला २०२२ हे निवडणुकीचे वर्ष उजाडले’
लॉकडाऊनच्या निर्णयावरून ठाकरे सरकारमध्येच संभ्रम?
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे सरकारला आठवले वचन; ५०० स्क्वेअर फूटांपर्यंतच्या घरांना करमाफी
नवीन वर्ष महागाईचे की स्वस्ताईचे? वाचा सविस्तर
समीर खान हे नवाब मलिक यांचे जावई आहेत. एनसीबीने समीर खान याला १४ जानेवारी रोजी ड्रग्स प्रकरणात अटक केली होती. कारवाई दरम्यानच्या चौकशीत समीर खान आणि करण सजनानी यांच्यात एका ऍपच्या माध्यमातून आर्थिक व्यवहार झाल्याचे समोर आले होते, समीर याने करण सजनानी याला काही रक्कम पाठवली होती असा दावा एनसीबीने केला होता. त्यानंतर एनसीबीने ब्रिटीश नागरिक करण सजनानी आणि राहिला फर्निचरवाला यांच्याकडून २०० किलोचे ड्रग्ज जप्त केल्याची माहिती एनसीबीने दिली होती.