मुंबईतील दादर रेल्वे स्थानकावर बॅगेत मृतदेह सापडल्याप्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी मृत अर्शद अली शेखच्या पत्नीला अटक केली आहे. अर्शदची पत्नी रुक्सानाचा या हत्येमध्ये सहभाग असल्याचे आढळून आल्यानंतर पायधुनी पोलिसांनी तिला अटक केली आहे.
रुक्सना असे मृत अर्शद अली शेखच्या पत्नीचे नाव आहे. अर्शद अली शेख हत्या प्रकरणी पत्नीला देखील अटक करण्यात आली आहे. मृताची पत्नी रुक्सना हिचे पतीचा मित्र आणि आरोपी जय चावडा यांच्यासोबत प्रेमसंबंध असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रेमसंबंधातूनच अर्शद अली शेख हत्या झाल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. मुंबईतील पायधुनी परिसरात आरोपी जय चावडा याने अर्शदला दारू पिण्यासाठी बोलावून त्याचा मित्र शिवजीत सिंगच्या मदतीने त्याची हत्या केली होती. अर्शदवर हातोड्याने वार करत त्याची हत्या करून मृतदेह बॅगेत भरून तुतारी एक्स्प्रेसमध्ये चढण्याच्या बेतात असताना दोघांना पोलिसांनी दादर रेल्वे स्थानकावर पकडले. मृत अर्शद अली शेख आणि दोन्ही आरोपी मूकबधिर आहेत.
हे ही वाचा:
सर्वसामान्यांना मोठा दिलासा; ७० औषधे होणार स्वस्त
बांगलादेशी भारतात घुसत होते, सीमासुरक्षा दलांनी रोखले
कुस्तीपटू अंतिम पंघाल अडचणीत; शिस्तभंगाचा आरोप करत पॅरिस सोडण्याचे आदेश
कुस्तीपटू विनेश फोगाटचा कुस्तीला रामराम!
५ ऑगस्ट रोजी आरोपीना दादर रेल्वे स्थानकांवर अटक करण्यात आली होती. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी आरोपींची ते एका सुटकेसमध्ये भरून एक्स्प्रेसमध्ये चढण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, आरोपींकडून ते सुटकेस उचलण्यात येत न्हवते. गस्त घालणाऱ्या रेल्वे पोलिसांचे त्याकडे लक्ष्य गेले आणि प्रकरण उघडकीस आले. काहीही दिसू नये म्हणून मृतदेह पूर्णपणे प्लास्टिकमध्ये गुंडाळण्यात आला होता. मात्र, पोलिसांनी बॅग तपासणी मोहिमेदरम्यान त्यांना पकडले. या प्रकरणी मृत व्यक्तीच्या पत्नीला देखील अटक करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.