आईने आत्महत्या केली, पण पोलीस शिपायाने वाचवले मुलाचे प्राण!

आईने आत्महत्या केली, पण पोलीस शिपायाने वाचवले मुलाचे प्राण!

एका महिलेने आपल्या मुलासोबत उपनगरीय रेल्वेच्या डब्यातून उडी मारून आत्महत्या केल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. या घटनेत महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर मुलगा गंभीर जखमी झाला आहे. बानू मोरे (३०) असे मृत महिलेचे नाव असून तिने तिचा मुलगा अमित मोरे (७) याला घेऊन विद्याविहार रेल्वे स्थानकाजवळ सीएसएमटीकडे जाणाऱ्या धीम्या लोकलमधून उडी घेतली. पण पोलिस शिपायाने त्या जखमी मुलाला वाचवले.

बानू मोरे ही महिला शनिवारी (९ ऑक्टोबर) तिच्या मुलासोबत सीएसएमटीकडे जाणाऱ्या धीम्या लोकलच्या महिला डब्यातून प्रवास करत होती. तिने आपल्या मुलासह रात्री १२.३० च्या सुमारास चालत्या गाडीतून उडी मारली. जवळच कर्तव्यावर असणारे पोलीस शिपाई करतुरे यांना घटनेची माहिती मिळता त्यांनी लगेच घटनास्थळी धाव घेतली. तेव्हा महिला मृत अवस्थेत होती, तर मुलगा जखमी अवस्थेत दिसून आला. मुलाला तातडीने उपचार मिळावेत म्हणून करतुरे यांनी त्वरित मुलाला उचलून राजावाडी रुग्णालय गाठले.

राजावाडी रुग्णालयात प्राथमिक उपचार करून मुलाला सायन रुग्णालयात नेण्यास सांगितले. मात्र, सायन रुग्णालयाने या मुलास उपचारासाठी दाखल करून घेण्यास टाळाटाळ केली. या पूर्ण वेळेत पोलीस शिपाई करतुरे स्वतः मुलासोबत थांबले होते. सायन रुग्णालयाकडून उडवाउडवीची उत्तरे देण्यात येत होती. कर्तव्यावरील डॉ. भारद्वाज यांना वारंवार विनंती करून आणि रुग्णाच्या नातेवाईकांना, पोलिसांना, पत्रकारांना होणाऱ्या त्रासाची जाणीव करून दिल्यावर डॉक्टरांनी मुलाला रुग्णालयात दाखल करून न घेता २.०० वाजता डिस्चार्ज दिला. महिलेने घरगुती कारणांवरून असे टोकाचे पाऊल उचलले असल्याचे दिसून आले आहे.

Exit mobile version