ऑनलाईन औषधे मागवणे नवी मुंबईतील एका तरुणीला चांगलेच महागात पडले आहे.
कोपरखैरणे येथील एका २५ वर्षीय तरुणीने काही औषधांचा ऑनलाईन शोध घेतला होता, ती औषधे घरपोच करून देण्याच्या बहाण्याने सायबर टोळीने या तरुणीला तब्बल दीड लाख रुपयांचा गंडा घातल्याचे प्रकरण समोर आले आहे. तरुणीने मागविलेले औषध बेकायदा असून तिच्यावर पोलीस केस करण्याची भीती दाखवून तिच्याकडून ही रक्कम उकळण्यात आली. या प्रकरणातील सायबर गुन्हेगारांवर कोपरखैरणे पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे.
तरुणीने १ सप्टेंबर रोजी वेबसाईटवर एका औषधाचा शोध घेतला होता. त्या वेबसाईटवर तरुणीने संपर्कासाठी म्हणून व्हॉट्सअॅप क्रमांक टाकला होता. त्यानंतर एका व्यक्तीने त्याच दिवशी मणिपूर ट्रेडर्स कंपनीचा सेल्स मॅनेजर साजिद हुसेन असल्याचे भासवून तरुणीशी संपर्क साधून तिला हवे असलेले औषध त्यांच्याकडे असून औषधाची किंमत पाच हजार असल्याचे सांगितले. तसेच ही रक्कम दिल्यास औषध दोन दिवसांत घरपोच मिळेल, असे तिला सांगितले. तरुणीने गुगल पे द्वारे पाच हजार रक्कम पाठवून दिल्यावर आणखी काही बहाण्याने तिच्याकडून अजून पाच हजार रुपये मागवून घेतले.
हे ही वाचा:
शिवसेना उत्तर प्रदेश निवडणूकीच्या रिंगणात! यावेळी तरी डिपाॅझिट वाचणार?
ठाकरे सरकार बेजबाबदार आणि असंवेदनशील! महिला आयोगाचे ताशेरे
पैशाचे आमिष दाखवून धर्मांतर करणारा ख्रिस्ती भोंदू अटकेत
मेडवेडेवने जिंकले ‘अमेरिकन ड्रीम’! जोकोविचचे ऐतिहासिक स्वप्न भंगले
औषधाच्या वाहतूक खर्चासाठी अमित पटेल या व्यक्तीला पाच हजार रुपये पाठविण्यास सांगून ही रक्कम तिला परत केली जाईल, असे सांगण्यात आले. त्यामुळे हे पैसे पाठवल्यावर त्याच दिवशी अमित पटेल या व्यक्तीने व्हॉट्सअॅपद्वारे तिने मागवलेले औषध बेकायदा असून पोलिसांनी पकडल्याचे सांगितले. तसेच पोलीस कर्मचारी हे प्रकरण मिटवण्यासाठी २५ हजारांची मागणी करत असल्याचे तिला सांगितले, तसेच ती रक्कम न दिल्यास पोलिसांना तिचा पत्ता देण्याची भीती तरुणीला दाखवली. त्यामुळे तरुणीने घाबरून २५ हजार रुपये पाठवून दिले. त्यानंतरही पोलिसांचे वेगवेगळे बहाणे देत आणि तरुणीला भीती घालत त्यांनी तरुणीला अजून काही रक्कम त्यांना देण्यास भाग पाडले. अशा प्रकारे तरुणीने वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये दीड लाख रुपये पाठविल्यानंतरही आणखी पैसे मागत असल्याने तरुणीने पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार केली.