रश्मी शुक्ला फोन टॅपिंग प्रकरण बंद

सीबीआयचा क्लोजर रिपोर्ट न्यायालयाने स्वीकारला

रश्मी शुक्ला फोन टॅपिंग प्रकरण बंद

आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांना फोन टॅपिंग प्रकरणात मोठा दिलासा मिळाला आहे. फोन टॅपिंग प्रकरणाने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. दरम्यान, केंद्रीय अन्वेषण विभागाने म्हणजेच सीबीआयने दाखल केलेला क्लोजर रिपोर्ट न्यायालयाने मंगळवार, २२ ऑगस्ट रोजी स्वीकारला आहे. त्यामुळे आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

महाविकास आघाडीच्या सरकारच्या वेळी २०१९ साली वाटाघाटी सुरू असताना महाराष्ट्र गुप्तचर विभागाच्या तत्कालीन प्रमुख रश्मी शुक्ला यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन टॅप केल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणी देवेंद्र फडणवीस यांचा जबाब देखील नोंदवण्यात आला होता. सीबीआयने आपल्या तपासात जे आरोप केलेत ते निष्पन्न होत नसल्याचे सांगितले. त्यानंतर सीबीआयने क्लोजर रिपोर्ट दाखल केला आणि त्याला न्यायालयाने मान्यता दिली आहे. आता हे प्रकरण बंद होणार आहे.

विरोधीपक्षनेते असताना देवेंद्र फडणवीसांनी मार्च २०२१ मध्ये फोन टॅपिंग संदर्भात गंभीर आरोप केले होते. १९८८ च्या बॅचच्या आयपीएस अधिकारी असलेल्या रश्मी शुक्ला या प्रकरणामुळे चर्चेत आल्या होत्या. मुंबईचे तत्कालीन पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे भ्रष्टाचारात गुंतलेले असल्याचे पत्र लिहिले होते. त्यानंतर राज्यातील विधान सभेचे तत्कालीन विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी फोन रेकॉर्डिंगचा ६.१ जीबी डेटा आपल्याकडे असल्याचे सांगून त्यात काही पोलिस अधिकारी आपल्या बदल्यांसंदर्भात देशमुखांच्या आणि गृहविभागाच्या संपर्कात असल्याचा आरोप करण्यात आला होता. याच फोन टॅपिंगसंदर्भातील कागदपत्रेही उघड झाली होती. फडणवीस तेव्हा म्हणाले होते की, जेव्हा शुक्ला या राज्य गुप्तचर विभागाच्या आयुक्त होत्या तेव्हा त्यांनी हे फोन टॅपिंग केले होते.

हे ही वाचा:

विक्रोळीतील पालिका शाळेतील चार विद्यार्थिनींवर शिक्षकाकडून लैंगिक अत्याचार

चांद्रयानाच्या लँडिंगचा ऐतिहासिक क्षण घरबसल्या अनुभवता येणार

महिला पोलिस आणि मुलगी घरी मृतावस्थेत; पतीचा मृतदेह झाडावर

अभिनेते सनी देओल म्हणतात, आता निवडणूक लढणार नाही!

दरम्यान, ठाकरे सरकार कोसळल्यानंतर हे प्रकरण सीबीआयकडे वर्ग करण्यात आले होते. आता सीबीआयने क्लोजर रिपोर्ट दिल्यामुळे या प्रकरणाचा तपास थांबला आहे. यामुळे देवेंद्र फडणवीस आणि रश्मी शुक्ला या दोघांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Exit mobile version