‘बेस्ट’च्या कंडक्टरवर धावत्या बसमध्ये चाकूहल्ला, पैसे लुटले, मोबाईल हिसकावला!

हल्ला करणाऱ्या केली अटक

‘बेस्ट’च्या कंडक्टरवर धावत्या बसमध्ये चाकूहल्ला, पैसे लुटले, मोबाईल हिसकावला!

बेस्ट बस वाहकावर धावत्या बस मध्ये चाकूने हल्ला करून प्रवासी भाड्याची रक्कम लुटण्याचा धक्कादायक प्रकार मुंबईतील धारावी पिवळा बंगला येथे गुरुवारी रात्री घडला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या बस वाहकाला उपचारासाठी तात्काळ सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बस वाहकाचा मोबाईल फोन चोरी करून पळून गेलेल्या लुटारूला धारावी पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेने बेस्ट बस वाहकामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

शाबाज खान असे हल्लेखोर लुटारूचे नाव आहे. शाबाज खान हा धारावीतील गुंड असून त्याच्यावर धारावी आणि परिसरातील पोलीस ठाण्याचे गंभीर गुन्ह्याची नोंद असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पायधुनी ते विक्रोळी आगार बेस्ट बस क्रमांक ७ ही बस गुरुवारी रात्री ९;३०च्या सुमारास पायधुनी येथून विक्रोळी आगार येथे जात असताना धारावी पिवळा बंगला या ठिकाणी आली असता २२ ते २५ वयोगटातील एक अनोळखी तरुण बसमध्ये चढला.

त्याने बस वाहक अशोक डगळे (४४) यांच्या खांद्यावर असलेली प्रवासी भाड्याची रक्कम असलेली बॅग खेचण्याचा प्रयत्न केला, बस वाहक अशोक डगळे यांनी त्याला विरोध करताच या तरुणाने स्वतःजवळील चाकू काढून बस चालकांवर सपासप वार करून अशोक डगळे यांच्या खिशातील मोबाईल फोन चोरी करून बसमधून उडी टाकून पळ काढला.

हे ही वाचा : 

आर्थिक संकटात सापडला मालदीव, भारताकडून ५ कोटी अमेरिकी डॉलरची मदत ! 

सांगा, आम्ही चालायचे तरी कसे?

तिरुपती लाडू प्रकरण पोहोचले केंद्रीय आरोग्य मंत्र्यांकडे

मदरशात झाडूच्या सहाय्याने एके ४७ बनवण्याचे प्रशिक्षण!

या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या अशोक डगळे यांना तात्काळ सायन रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. धारावी पोलिसांनी अशोक डगळे यांचा जबाब नोंदवून जबरी चोरीसह हत्याराने हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. लुटारूच्या शोधासाठी धारावी पोलीस ठाण्याचे गुंडा विरोधी पथकाला तात्काळ हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पाचारण करण्यात आले होते. धारावी पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेरा आणि खबऱ्याच्या मदतीने हल्लेखोर याची ओळख पटवून धारावी परिसरातून शादाब खान याला हत्यारासह अटक करण्यात आली आहे.

Exit mobile version