चर्नी रोड येथील वसतिगृहातील विद्यार्थिनीच्या हत्येप्रकरणातील आरोपी ओम प्रकाश कनोजिया याच्यावर सोमवार, १२ जून रोजी रात्री मरीन ड्राईव्ह येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर कनोजिया याच्या वडिलांनी रामदुलार यांनी सांगितले की, ‘गेली ३० वर्षे ते त्याच वसतिगृहात कामाला होते. मात्र, त्यांच्या मुलाने त्यांचे नाव मातीत मिसळले.’
‘मी ३० वर्षे वसतिगृहात काम करून निवृत्ती घेतली. मुलगा ओम प्रकाशही १५ वर्षांहून अधिक काळ तिकडे काम करत होता. त्याची एकदाही कसली तक्रार आली नाही. माझ्या मुलाने गुन्हा केला की नाही याची कल्पना नाही. मात्र, आमचं नाव त्याने मातीत मिसळलं,’ असं रामदुलार म्हणाले. पोलिसांनी ओम प्रकाश याच्या आत्महत्येबद्दल माहिती दिली तेव्हा कुलाबा येथे होतो. आता गावी जाण्यासाठी तिकिटाच्या शोधात असल्याचं रामदुलार म्हणाले.
कनोजिया याचे कुटुंबीय उत्तर प्रदेशमधील प्रतापगडमध्ये वास्तव्यास आहे. या प्रकरणातील पीडित तरुणी ही मुळची अकोला येथील होती. ती २०२१ पासून या वसतिगृहात राहून बांद्रा येथील नामांकित महाविद्यालयात शिक्षण घेत होती. कंप्युटर इंजिनिअरच्या दुसऱ्या वर्षात ती शिकत होती. संबंधित प्रकरण ६ जूनच्या संध्याकाळी उघडकीस आले. फोन कॉल्सला उत्तर देत नसल्याचे लक्षात येताच वसतिगृहाच्या कर्मचाऱ्यांनी तिच्या खोलीकडे जाण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी त्यांनी खिडकीतून मुलीचा मृतदेह विवस्त्र परिस्थितीत पाहिला. तिच्या खोलीला बाहेरून कडी असल्याचेही लक्षात आले. त्यानंतर त्यांनी तातडीने याची माहिती पोलीस ठाण्यात दिली.
तपासादरम्यान काही तासांनी पोलिसांना ओम प्रकाश याचा मृतदेह चर्नीरोड रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे ट्रॅकवर आढळला. तसेच त्याच्या खिशात पीडित तरुणीच्या खोलीची चावी सापडल्याचे पोलीस म्हणाले. ओम प्रकाश याने पहाटे ४.४४ वाजता वसतिगृह सोडलं आणि पहाटे ४.५८ वाजता आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याचा मृतदेह वडिलांनी ओळखला असून ताब्यात दिल्याचेही पोलिसांनी सांगितले. ओम प्रकाश याने पहिल्या मजल्यावरून जिन्याने जाण्यापूर्वी पाईपची मदत घेतल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
हे ही वाचा:
रील बनवताना विहिरीत पडून तरुणाचा मृत्यू
सात महत्त्वाच्या शहरांमध्ये पुराचा धोका कमी करण्यासाठी अडीच हजार कोटींचे प्रकल्प उभारणार
ट्यूशन क्लासला दांडी मारून समुद्रकिनाऱ्यावर गेले अन् समुद्रात ओढले गेले
‘उद्धव ठाकरेंच्या १९ बंगल्यांनंतर आता कागदपत्रे गायब’
ओम प्रकाश याचे लग्न झालेले असून त्याला १२ आणि तीन वर्षांची अशा दोन मुली आहेत. ओम प्रकाश याच्या पगारातून घरखर्च होत होता. त्याचा लहान भाऊ त्याच वसतिगृहात लौंड्रीचे काम करत असून गेले दोन महिने तो गावीच आहे.