राज्याची उपराजधानी नागपूरमधून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तीन चिमुकल्यांचे मृतदेह एका कारमध्ये आढळल्याने खळबळ उडाली आहे. काल खेळताना ही तिन्ही मुले बेपत्ता झाली होती. नागपूरच्या फारूक नगरमध्ये या मुलांचे मृतदेह आढळून आले. नागपूर पोलीस या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करत आहेत.
पाचपावली पोलिस हद्दीतील फारूक नगरच्या मोहम्मदीया मशिदीजवळ राहणाऱ्या दोन मुली आणि एक मुलगा शनिवार, १७ जून रोजी दुपारी अचानक बेपत्ता झाले होते. आलिया फिरोज खान (वय ६), तौसिफ फिरोज खान (वय ४), आफरीन इर्शाद खान (वय ६) अशी मृत चिमुकल्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी बारा वाजता फारुखनगरला लागून असलेल्या खंतेनगर येथील शाळेच्या मैदानावर ही मुले खेळण्यासाठी गेली होती. बराच वेळ होऊनही ती घरी परतली नाहीत. यानंतर कुटुंबीय आणि परिसरातील नागरिकांनी फारुखनगर, बाबा बुद्धाजीनगर, वैशालीनगर, टेका, नवी वस्ती, महेंद्रनगर आणि आजुबाजूच्या परिसरात शोध घेतला. मुले कुठेच आढळली नाहीत. यामुळे कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी मुलांचा शोध सुरू केला.
हे ही वाचा:
गुजरातनंतर ‘बिपरजॉय’चा राजस्थानला तडाखा
‘पंजाबचे मुख्यमंत्री आहेत की अरविंद केजरीवालांचे वैमानिक?’
काँग्रेसची बैठक आटोपून नाना पटोले निघाल्यावर कार्यकर्त्यांमध्ये फ्रीस्टाइल हाणामारी
साक्षी मलिक ही काँग्रेसच्या हातातील बाहुले! कुस्तीगीरांमध्ये जुंपली
रविवार, १८ जून रोजी सांयकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास एका नादुरुस्त कारमध्ये त्या तिघांचेही मृतदेह आढळले. दरम्यान, त्यांचा गुदमरून मृत्यू झाला की घातपात झाला याचा पोलिस तपास करीत आहे. या चिमुकल्यांच्या घातपाताची शंका नागपूर पोलिसांनी व्यक्त केली होती. गेल्या काही दिवसांपासून नागपुरात मुले बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढले आहे. नागपूर पोलिस त्याबाबत तपास करत आहेत. गेल्या काही दिवसांपासून नागपूरमधून मुले बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढले आहे. मध्य प्रदेशमधील एका आरोपीच्या पोलिसांनी मुसक्याही आवळल्या होत्या. हे प्रकरण ताजे असतानाच आता तीन मुलांचे मृतदेह आढळल्यामुळे नागपूरमध्ये खळबळ उडाली आहे.