मणिपूरमधील हिंसाचार अजूनही शमलेला नाही. अनेक ठिकाणी जमाव आक्रमक होत असल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. लष्कराला रोखण्यासाठी रस्ते बंद करण्यापर्यंत लोकांची मजल गेली आहे. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आसाम रायफल्स आणि शीघ्र गती दलाला लवकरात लवकर पाचारण केले जाणार आहे.
मणिपूरमधील थौबल जिल्ह्यात शेकडोंच्या जमावाने राखीव दलाच्या तळावर हल्ला करून शस्त्रास्त्रे पळवण्याचा प्रयत्न केला. मात्र सुरक्षा दलाने त्यांना रोखले. यावेळी उडालेल्या संघर्षात एकाचा मृत्यू झाला, तर काहीजण जखमी झाले, असे भारतीय लष्कराने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे. त्यानंतर जमावाने सुरक्षा दलांना रोखण्यासाठी रस्ते बंद करण्याचाही प्रयत्न केला. मात्र सुरक्षा दलाच्या सतर्कतेमुळे परिस्थिती नियंत्रणात आली.
हे ही वाचा:
अमेरिकी वृत्तपत्रांकडून भारतीय अंतराळ संशोधन कार्यक्रमांचे कौतुक
वेस्ट इंडीजला पराभूत करणाऱ्या झिम्बाब्वेचेही आव्हान संपुष्टात
अजित आगरकर भारताचे नवे राष्ट्रीय क्रिकेट निवड समिती प्रमुख
केंद्रीय उत्पादन शुल्कात सर्वाधिक उत्पन्न देणाऱ्या कंपन्यांत भारत पेट्रोलियमचा डंका
मणिपूरच्या काही भागांत अजूनही तणावाचे वातावरण आहे. हिंसाचारावर नियंत्रण आणण्यासाठी राज्यभरात ११८ चौक्या उभारण्यात आल्या असून आतापर्यंत ३२६ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. मैतेई समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेतल्याच्या निषेधार्थ ऑल ट्रायबल स्टुडंट्स युनियन ऑफ मणिपूर (एटीएसयूएम) संघटनेने ३ मेपासून आंदोलन पुकारले होते. मात्र त्या दिवसापासून मणिपूरमध्ये जातीय संघर्ष उसळला आहे.