अमरावतीतील एका हिंदू मुलीला एका मुस्लिम तरुणाने पळवून नेल्याचा आरोप खासदार नवनीत राणा यांनी केला होता. यावरून पोलिस आणि नवनीत राणा यांच्यात शाब्दिक चकमक झाली होती. त्यानंतर गुरुवार, ८ सप्टेंबर रोजी ही मुलगी साताऱ्यात सापडली होती. या मुलीची प्रतिक्रिया समोर आली आहे. ‘टीव्ही ९’ने या मुलीशी संवाद साधला असता तिने आपली प्रतिक्रिया दिली आहे.
चार दिवसांनी या मुलीला गुरुवारी साताऱ्यातून अमरावतीत परत आणण्यात आलं. त्यानंतर या मुलीने आपण घर सोडून का गेलो, याचे उत्तर दिले आहे. “मी कोणासोबतही पळून गेले नव्हते. मी घरुन माझ्या शिक्षणासाठी निघून गेले होते. पण माझी बदनामी केली गेली. पण मुळात तसं काहीच नसून माझ्या बद्दल सुरू असलेली बदनामी थांबवा,” अशी प्रतिक्रिया त्या मुलीने दिली आहे.
शिक्षणासाठी ही मुलगी स्वतः घरातून रागात निघून गेली होती. पुण्यावरून ती सातारा येथे रेल्वेने येत असताना पोलिसांनी तिला ताब्यात घेतले होते, अशी माहिती अमरावती पोलीस आयुक्त आरती सिंग यांनी दिली आहे.
अमरावतीतील राजापेठ भागात एका हिंदू मुलीचे अपहरण करून तिला डांबून ठेवण्यात आल्याचे आरोप मुलीच्या कुटुंबीयांनी केले होते. मुलीने केलेल्या चॅटिंग वरून पोलिसांनी सोहेल शहा या संशयित आरोपीला राजापेठ पोलीस ठाण्यात हजर केले होते. मात्र, संबंधित मुलीचा शोध न लागल्याने भारतीय जनता पक्ष, विश्व हिंदू परिषद कार्यकर्ते आणि अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आक्रमक झाल्या होत्या.
हे ही वाचा:
याकुब मेमनची कबर का बनते आहे मजार?
पहिल्यांदाच ठाकरेंविरोधात कुणी ‘मैदाना’त उतरलंय!
‘बॉलीवूडच्या सिनेमातून भारतीयत्व हरवले आहे’
या प्रकरणाच्या चौकशीसाठी नवनीत राणा यांनी पोलिसांना कॉल केला असता त्यांनी राणा यांचा कॉल रेकॉर्ड केला यावरून नवनीत राणा आणि पोलिसांमध्ये शाब्दिक चकमक झाली होती.