काही दिवसांपूर्वीच फेरीवाल्यांविरोधात कारवाई करण्यासाठी गेलेल्या ठाणे पालिका अधिकारी कल्पिता पिंगळे यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला होता. हे हल्लाप्रकरण शांत होताच शहरात फेरीवाल्यांनी पुन्हा आपले बस्तान मांडायला सुरुवात केली आहे. तसेच या फेरीवाल्यांकडून पालिकेचे कर्मचारीच चिरीमिरी वसूल करत असल्याचे प्रकरण समोर आले आहे. गळ्यात पालिकेचे ओळखपत्र घालून फेरीवाल्यांकडून १०- १० रुपये हप्तावसुली करणाऱ्या एका कर्मचाऱ्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. मनसे कार्यकर्त्यांनी या कर्मचाऱ्याला चोप देऊन पोलिसांच्या हवाली केले आहे.
ठाणे महापालिकेच्या अधिकारी कल्पिता पिंगळे यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर या अनधिकृत फेरीवाल्यांच्या मागे कोणते राजकीय नेते आणि महापालिकेचे अधिकारी आहेत, त्याचा तपास व्हावा अशी मागणी करण्यात आली होती. त्यानंतर सोमवारी (२७ सप्टेंबर) रात्री पालिका कर्मचाऱ्याकडून केल्या जात असलेल्या हप्तावसुलीची व्हिडीओ मोबाईलवर चित्रित करत मनसे पदाधिकाऱ्यांनी कर्मचारी गणेश शिंदे याला रंगेहात पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. हा कर्मचारी फेरीवाल्यांकडून प्रत्येकी १० रुपये वसूल करत होता.
हे ही वाचा:
नवजोत सिंह सिद्धू यांची ‘हिट विकेट’
शिक्षण विभागातील १० पैकी ९ अधिकारी मुस्लिम
पालिकेच्या रेकोर्डवर ठाणे शहरात पाच हजार फेरीवाले आहेत, मात्र प्रत्यक्षात त्यांची संख्या लाखोंमध्ये पोहचली आहे. राजकीय नेते आणि पालिकेचा वरदहस्त फेरीवाल्यांवर आहे. त्या बदल्यात फेरीवाले नियमित त्यांना हप्ता पोहचवतात. त्यांचा रेटकार्ड ठरलेला असून त्यातून दररोज सुमारे दोन कोटी जमा होतात आणि ते पोलीस, पालिका, राजकीय व्यक्तींपर्यंत पोहचवले जातात.
‘ठाण्यात कोट्यावधी रुपयांची हप्तावसुली केली जाते हे महापौरांचे म्हणणे खरे आहे. एकीकडे फेरीवाले महिला अधिकाऱ्यांवर प्राणघातक हल्ले करतात आणि दुसरीकडे पालिकेचे अधिकारीच हप्तावसुली करतात. त्यामुळे फेरीवाल्यांकडून पालिकाच हप्तेवसुली करत असल्याचे समोर आले आहे. आयुक्त बघ्याच्या भूमिकेत आहेत. आता कर्मचाऱ्याला रंगेहात पकडून दिलेले आहे. यावर आता चौकशी होऊन कारवाई करावी,’ असे मनसे ठाणे- पालघरचे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.
‘हप्तावसुली करणारा कर्मचारी हा पालिकेचाच कर्मचारी आहे. या कर्मचाऱ्याला पालिकेने तत्काळ निलंबित केले आहे. पालिकेचे अधिकारी गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस ठाण्यात गेले असून चौकशी करून योग्य ती कठोर कारवाई केली जाईल,’ असे ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी सांगितले आहे.