फोफावत असलेल्या दहशतवादाला आळा घालण्याचे जगभरातून प्रयत्न होत असताना आंतरराष्ट्रीय दहशतवादी हरविंदर सिंग रिंदा याच्या भावाला आणि वडिलांना अटक करण्यात आली आहे. खंडणीप्रकरणात त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला होता. याप्रकरणीच त्यांना अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्यांना ४ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांच्या हत्येनंतर पोलिसांनी रिंदाच्या टोळीवर लक्ष्य केंद्रित केले होते. रिंदाचे अनेक हस्तक अद्याप तुरुंगात आहेत. रिंदाही पाकिस्तानात पळून गेल्याची शक्यता आहे. परंतु, त्यानंतरही रिंदाच्या नावाने धमकावून खंडणीचे प्रकार सुरूच होते. काही महिन्यांपूर्वी स्थानिक गुन्हे शाखेचे तत्कालीन पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांच्या तक्रारीवरून रिंदाचे वडील आणि भावासह अन्य काही जणांवर गुन्हा नोंद झाला होता.
दरम्यान, हरविंदर सिंग रिंदा हा पाकिस्तानमध्ये पळून गेल्याचे सांगण्यात येत आहे. शिवाय त्याचा मृत्यू झाल्याचीही चर्चा आहे. परंतु, रिंदाच्या नावाने अद्याप खंडणी उकळण्याचे प्रकार सुरूच होते. दहशतवादी हरविंदर सिंग रिंदा याने नांदेडात बिल्डर, उद्योजक, डॉक्टर, व्यापारी यासह अनेकांना जीवे मारण्याची धमकी देऊन लाखो रुपयांची खंडणी उकळली आहे. खंडणीची ही रक्कम तो देशविरोधी कारवायांसाठी वापरत असल्याचा तपास यंत्रणेचा दावा आहे.
हे ही वाचा:
राहुल द्रविडकडे प्रशिक्षकपदाची पुन्हा धुरा
फेसबुक लाईव्हवरून काम करणाऱ्यांनी माझ्यासारख्या मुख्यमंत्री कार्यकर्त्याला शिकवू नये!
मणिपूरातील बंडखोर गट ‘यूएनएलएफने’ शांतता करारावर केली स्वाक्षरी!
पक्ष प्रमुखच नाहीत, तर पक्षादेश कुठला?
तक्रार देण्यासाठी कुणीच पुढे येत नसल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे तत्कालीन पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांनी वजिराबाद पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यावरून तपासात रिंदाच्या नावाने गोळा झालेली खंडणी हे त्याचे वडील चरणजित सिंग संधू आणि भाऊ सरबज्योतसिंह संधू याच्याकडे देण्यात येत होती, असे समोर आले आले. अखेर पोलिसांनी त्यांना अटक केली असून न्यायालयाने दोघांनाही ४ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस कोठडीत आणखी काही महत्त्वाचे धागेदोरे समोर येण्याची शक्यता आहे.