जम्मू काश्मीरच्या राजौरीमध्ये लष्करी चौकीवर दहशतवाद्यांचा हल्ला; जवानांकडून चोख प्रत्युत्तर

परिसरात लष्कराकडून शोध मोहिमेला सुरुवात

जम्मू काश्मीरच्या राजौरीमध्ये लष्करी चौकीवर दहशतवाद्यांचा हल्ला; जवानांकडून चोख प्रत्युत्तर

जम्मू-काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यात दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा लष्कराच्या तळावर हल्ला केला. राजौरी जिल्ह्यातील गुंधा भागात दहशतवादी आणि लष्कर यांच्यात चकमक झाली. दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याला भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले. सोमवार, २२ जुलै रोजी लष्कराने मोठा दहशतवादी हल्ला हाणून पाडला आहे. माहितीनुसार पहाटे ३ वाजता दहशतवाद्यांनी लष्कराच्या छावणीवर गोळीबार केला, ज्यामध्ये एक जवान जखमी झाल्याची माहिती आहे.

राजौरीतील दुर्गम गावात लष्कराच्या चौकीवर झालेला मोठा दहशतवादी हल्ला हाणून पाडण्यात आला आहे. हा हल्ला अशावेळी झाला आहे, जेव्हा लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी एक दिवस आधी जम्मूचा दौरा केला होता. गेल्या काही दिवसांत जम्मू-काश्मीरमध्ये लष्करावर अनेक दहशतवादी हल्ले झाले आहेत. ८ आणि १५ जुलै रोजी कठुआच्या माचेडी आणि डोडाच्या देसा जंगल भागात दोन वेगवेगळ्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये एका कॅप्टनसह लष्कराचे नऊ जवान हुतात्मा झाले होते.

हे ही वाचा:

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडन यांची निवडणुकीतून माघार

बांगलादेशातील ५६ टक्के आरक्षण रद्द, ९३ टक्के जागा गुणवत्तेवर भरणार !

इस्रायलचा येमेनवर बॉम्ब हल्ला, तिघांचा मृत्यू, ८० जखमी !

एक दिवस मराठेच जरांगेंची गोधडी हिसकावून घेतील…

राजौरीमध्ये झालेल्या हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने सर्च ऑपरेशन सुरु केले आहे. माहितीनुसार, दहशतवाद्यांच्या हल्ल्यामध्ये एक जवान जखमी झाला आहे. त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून उपचार सुरु आहेत. गेल्या काही दिवसांपासून जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यांमध्ये वाढ झाली आहे. जम्मू आणि काश्मीरमध्ये विधानसभेच्या निवडणुका दोन ते तीन महिन्यात लागू शकतात. या पार्श्वभूमीवर हे हल्ले वाढले असल्याचं बोललं जात आहे. या वर्षाच्या सुरुवातीपासून जम्मू प्रांतातील सहा जिल्ह्यांमध्ये झालेल्या सुमारे १२ दहशतवादी हल्ल्यांमध्ये ११ सुरक्षा जवान हुतात्मा झाले तर एक ग्राम संरक्षण रक्षक देखील मृत पावला. पाच दहशतवाद्यांचा खात्मा देखील करण्यात आला.

Exit mobile version