सोमवारी जम्मू काश्मीरमधील श्रीनगरमध्ये सशस्त्र पोलिसांच्या ताफ्यावर अतिरेक्यांनी बेछूट गोळीबार केला. या अंदाधुंद गोळीबारात दोन पोलीस हुतात्मा झाले असून १४ पोलीस जखमी झाले आहेत. सर्व जखमी पोलिसांवर रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
श्रीनगरमधील पंथचौक परिसरात पोलिसांच्या ९व्या बटालियनच्या बसवर सोमवारी अतिरेक्यांनी अचानक हल्ला केला. या हल्ल्यानंतर पोलिसांनीही अतिरेक्यांना प्रत्युत्तर दिले. मात्र, पोलिसांनी उलट प्रत्युत्तर देताच अतिरेक्यांनी या परिसरातून पलायन केले. या हल्ल्यात दोन पोलीस शहीद झाले असून १४ पोलीस जखमी झाले आहेत. या घटनेनंतर पोलिसांनी या संपूर्ण परिसरात सर्च ऑपरेशन सुरू केले आहे. अतिरेकी पंथचौक परिसरातच लपून बसलेले असण्याची शक्यता असल्याने पोलिसांकडून कसून चौकशी केली जात आहे.
हे ही वाचा:
श्रीनगरमध्ये २ दहशतवाद्यांना कंठस्नान
मोदींनी कशी विश्वनाथ मंदिरातून, नागरिकांकडे ‘या’ तीन प्रतिज्ञा मागितल्या
प्रजासत्ताक दिनाला पाच मध्य आशियाई देशांना निमंत्रण
नाफ्ताली बेनेट यांचा ऐतिहासिक युएई दौरा
‘इंडियन एक्स्प्रेस’च्या वृत्तानुसार तीन अतिरेकी हे दुचाकीवरून आले आणि त्यांनी पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला केला. हे सर्व पोलीस आपली सेवा बजावून माघारी परतत होते. हल्ला करून झाल्यावर अतिरेक्यांनी अंधाराचा फायदा घेत पळ काढला, अशी माहिती पोलिसांनी दिली.
या हल्ल्याची जबाबदारी काश्मीर टायगर या दहशतवादी संघटनेने स्वीकारली आहे. पहिल्यांदाच या अतिरेकी संघटनेचे नाव समोर आले आहे. या घटनेनंतर जम्मू-काश्मीरमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. हल्ल्याची माहिती मिळाल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. दरम्यान, श्रीनगरच्या रंगरेथ परिसरात सोमवारी सुरक्षा दल आणि अतिरेक्यांमध्ये चकमक उडाली होती. या चकमकीत दोन अतिरेक्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलाला यश मिळाले होते.