राज्यातील पालघर जिल्ह्यात विरार परिसरात राम नवमीनिमित्त रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. सकल हिंदू समाजाने आयोजित केलेल्या या रॅलीदरम्यान तणाव निर्माण झाल्याची माहिती समोर आली आहे. या रॅलीमध्ये सहभागी झालेल्या लोकांवर काही अज्ञात व्यक्तींनी अंडी फेकल्याचा आरोप आहे. यामुळे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता, अशी माहिती पोलिसांनी सोमवारी दिली आहे.
सकल हिंदू समाजातर्फे रविवार, ६ एप्रिल रोजी रामनवमीच्या दिवशी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. माहितीनुसार, ही रॅली चिखलडोंगरी येथील सर्वेश्वर मंदिरापासून सुरू झाली आणि विरार (पश्चिम) येथील ग्लोबल सिटीमधील पिंपळेश्वर मंदिराकडे जात होती. रॅलीमध्ये १०० ते १५० वाहने होती. याशिवाय, एक रथ आणि दोन टेम्पो देखील रॅलीमध्ये सहभागी होती. पिंपळेश्वर मंदिराजवळ रॅली पोहचताच अचानक अंडी फेकण्यात आली, अशी माहिती समोर आली आहे. यामुळे भाविकांमध्ये संताप निर्माण झाला आणि परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. संबंधित घटनेची माहिती मिळताच बोळींज पोलिस ठाण्यातील कर्मचारी घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी सुव्यवस्था पूर्ववत केली.
बोळींज पोलिसांनी सार्वजनिक गैरप्रकार आणि धार्मिक भावना दुखावल्याबद्दल भारतीय न्याय संहिता कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे आणि परिसरात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पोलिस अधिकाऱ्यांनी जनतेला शांतता राखण्याचे आणि तणाव वाढवू शकणारी सोशल मीडियावर माहिती प्रसारित करण्यापासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे. तसेच एका व्यक्तीला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आल्याचे वृत्त ‘टाईम्स ऑफ इंडिया’ने दिले आहे.
हे ही वाचा :
भोंग्यांविरोधात आवाज उठवणाऱ्या सोमय्यांना धमकी; काय म्हणाले किरीट सोमय्या?
कुपवाड्यातील छाप्यात सापडली चिनी बनावटीची दुर्बीण, मशिनगन, हॅन्डग्रेनेड!
टॅरिफ वॉरमुळे शेअर बाजार गडगडला; जगात काय परिस्थिती?
काही जणांना विनाकारण छाती बडवण्याची सवय!
दरम्यान, पश्चिम बंगालमधील कोलकाता येथे रामनवमीच्या मिरवणुकीत सहभागी झालेल्या हिंदू भाविकांवर हल्ला करण्यात आला आणि त्यांच्या वाहनांची तोडफोड करण्यात आल्याचा आरोप भाजपाने केला आहे. मात्र, कोलकाता पोलिसांनी हे आरोप फेटाळून लावले. केंद्रीय मंत्री सुकंता मजुमदार यांनी आरोप केला आहे की, रामनवमीची मिरवणूक परतत असताना कोलकात्याच्या पार्क सर्कस सेव्हन पॉइंट परिसरात हिंदू भाविकांवर हल्ला करण्यात आला. “भगवे झेंडे लावणाऱ्या वाहनांवर दगडफेक झाली. विंडशील्ड तुटले. गोंधळ उडाला. हे अपघात नव्हते तर ते लक्ष्यित हिंसाचार होते आणि यावेळी पोलिस कुठे होते? तिथेच. पाहत होते. शांत,” असा आरोप त्यांनी केला. घटनेचा व्हिडिओ शेअर करणाऱ्या पश्चिम बंगाल भाजपने असा दावा केला आहे की, मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त असूनही कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.