अडीच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा
जर्मनीचा प्रसिद्ध टेनिसपटू बोरिस बेकर याला अडीच वर्षे तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. कर्ज फेडण्यात दिरंगाई करतानाच २५ लाख पौंड इतकी संपत्ती जाहीर न केल्याबद्दल त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.
५४ वर्षीय बोरिस बेकरला आता तुरुंगात जावे लागेल. त्याने सहा ग्रँडस्लॅम टेनिस विजेतीपदे जिंकलेली आहेत.
स्पेनमध्ये मलोर्का येथे त्याचे आलिशान घर असून त्यावरील ३० लाख पौंड इतके कर्ज त्याने फेडलेले नाही. तो त्याच्यावर आरोप होता. शिवाय, २०१७मध्ये तो दिवाळखोर झाल्याचेही प्रकरण न्यायालयात होते.
२००२मध्ये त्याने जर्मनीत करचुकवेगिरी केली होती आणि त्यात तो दोषी आढळला होता. त्याचा संदर्भ देत न्यायाधीश देबोरा टेलर यांनी म्हटले की, तुला यासंदर्भात ताकीद देण्यात आली होती तसेच संधीही देण्यात आली होती पण तू त्यावर कोणतेही पाऊल उचलले नाही.
हे ही वाचा:
पतियाळात ‘खलिस्तान मुर्दाबाद’चे नारे देणाऱ्या शिवसेना नेत्याचीच पक्षातून हकालपट्टी
खबरदार! वाकड्या नजरेने बघाल तर…
ऑइल बॉण्डमुळे पेट्रोल वाढीचे चटके
तुरूंगातून मलिकांचा मंत्रिमंडळ निर्णय, निलेश राणेंची टीका
बोरिस बेकर जेव्हा दिवाळखोर घोषित झाला तेव्हा त्याच्या डोक्यावर ५ कोटी पौंड इतके कर्ज होते. त्यासाठी त्याला आपल्या विम्बल्डन विजेतेपदाच्या ट्रॉफीही विकाव्या लागल्या होत्या. त्यासाठी त्याने आपली संपत्ती जाहीर करणे अपेक्षित होते. जेणेकरून त्यातून हे कर्जाचे पैसे वळते करता आले असते. जर्मनीतील लिमन शहरात त्याची १० लाख पौंडाची संपत्ती आहे शिवाय, या घरावर ७ लाख पौंड इतके कर्जही आहे. एका टेक्नॉलॉजी फर्ममध्ये त्याचे ६६ हजार पौंडांचे शेअर्सही आहेत. ही बाब त्याने लपविल्याचे निदर्शनास आले. त्याचे वकील जोनाथन लेडलॉ यांनी सांगितले की, बेकरकडे सध्या फुटकी कवडीही शिल्लक नाही. या सगळ्या न्यायालयीन प्रक्रियेमुळे त्याची कारकीर्द संपुष्टात आली असून यानंतरही पैसे कमावण्याची त्याची संधी उरलेली नाही.