बहुजन समाज पक्षाच्या (बसपा) मायावती यांच्या पक्षाचे तामिळनाडूचे प्रदेशाध्यक्ष आर्मस्ट्राँग यांची हत्या झाल्याचे वृत्त समोर आले आहे. सहा हल्लेखोरांनी आर्मस्ट्राँग यांची चेन्नई येथील त्यांच्या घराबाहेर हत्या केली. या हल्ल्यात आर्मस्ट्राँग हे गंभीर जखमी झाले. त्यानंतर उपस्थितांनी त्यांना रुग्णालयात दाखल केलं असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. दरम्यान, आर्मस्ट्राँग यांच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला केल्यानंतर हल्लेखोर पळून गेले. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
बसपाचे तामिळनाडूचे प्रदेशाध्यक्ष आर्मस्ट्राँग हे त्यांच्या चेन्नईतील घराबाहेर शुक्रवारी संध्याकाळी काही मित्रांबरोबर बसले होते. याचवेळी तीन दुचाकीवरून आलेल्या काही तरुणांनी आर्मस्ट्राँग यांना चाकूचा धाक दाखवायला सुरुवात केली. त्यानंतर आर्मस्ट्राँग यांच्याबरोबर असलेले त्यांचे मित्र पळून गेले. दरम्यान, हल्लेखोरांनी आर्मस्ट्राँगवर यांच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला केला. यानंतर आरडाओरडा होताच त्यांचे कुटुंबीय बाहेर आल्यानंतर हल्लेखोर पळून गेले. या हल्ल्यात आर्मस्ट्राँग हे गंभीर जखमी झाले होते. त्यांना कुटुंबियांनी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केलं. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.
ही घटना घडल्यानंतर पोलीस अधीक्षक प्रवीण कुमार यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. त्यानंतर आरोपींच्या अटकेसाठी एक विशेष पथक तयार करण्यात आले असल्याची माहिती त्यांनी दिली. दरम्यान, ही घटना घडली त्या परिसरात पोलिसांनी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. या प्रकरणाची चौकशी सुरु करण्यात आली आहे.
हे ही वाचा:
जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणी रवींद्र वायकरांना क्लीनचीट
जाग हिन्दू बांधवा प्राण संकटी तरी …
जगातील पहिली सीएनजी बाईक नितीन गडकरींच्या हस्ते पुण्यात लाँच
हिंदुत्ववादी शिवानी राजा ब्रिटनच्या निवडणुकीत जिंकल्या!
आर्मस्ट्राँग हे बसपाचे तामिळनाडूचे प्रदेशाध्यक्ष होते. त्यांनी २००६ शहरातील प्रभागात अपक्ष उमेदवार म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विजय मिळवला होता. त्यानंतर ते २००७ साली बहुजन समाज पक्षात सहभागी झाले. तामिळनाडूत आर्मस्ट्राँग यांच्या नेतृत्वात बहुजन समाज कार्यरत होता.