कल्पिता पिंपळे म्हणतात, हल्ल्यांना घाबरून कारवाई थांबवणार नाही!

कल्पिता पिंपळे म्हणतात, हल्ल्यांना घाबरून कारवाई थांबवणार नाही!

ठाणे महापालिकेच्या माजिवडा- मानपाडा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्त म्हणून कार्यरत असलेल्या कल्पिता पिंपळे यांच्यावर सोमवारी सायंकाळी एका फेरीवाल्याने जीवघेणा हल्ला केला होता. हल्ल्यामध्ये कविता यांची डाव्या हाताची दोन बोटे तुटली होती, तर उजव्या हाताला आणि डोक्यालाही गंभीर इजा झाली आहे. प्रभागातील अतिक्रमणे रोखणे हे आमचे काम असून त्यासाठीच आमची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यामुळे अशा हल्ल्यांना घाबरून कारवाई थांबवली जाणार नाही. प्रकृती बरी झाल्यावर काम सुरूच राहणार आहे. फेरीवाल्यांवर नियमानुसार कारवाई करण्यात येणार आहे. यापुढे अधिक सावधपणे, पुरेसे पोलीस संरक्षण घेऊन कारवाई केली जाईल, असे ठाम मत रुग्णालयात उपचार घेत असलेल्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांनी व्यक्त केले आहे.

कल्पिता पिंपळे यांच्यावर सोमवारी रात्री बोट जोडण्यासाठी मोठी शस्त्रक्रिया करण्यात आली. सध्या त्यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठाण्याच्या एका खासगी रुग्णालयात ठेवण्यात आले आहे. हल्ल्या दरम्यान पिंपळे यांच्या अंगरक्षकाचेही एक बोट तुटल्याने त्यांच्यावरही उपचार सुरू आहेत.

हे ही वाचा:

तुम्ही आराम करा, काळजी घ्या, बाकीचं आम्ही बघतो

…त्यांच्या जाळ्यात गावले दीड कोटी!

गौतम अदानींच्या संपत्तीत वाढ

टेस्लाची ‘ही’ चार मॉडेल्स भारतात

कासारवडवली परिसरात सायंकाळी मोठ्या संख्येने फेरीवाले बसत असल्याने या भागात संध्याकाळच्या वेळी कारवाई करण्याचे ठरले होते. त्यानुसार कारवाई पाहण्यासाठी गेलेल्या कल्पिता यांच्यावर गाडीतून उतरल्यानंतर मागून आलेल्या हल्लेखोराने हल्ला केला. डोक्यावर हल्ला केला होता; मात्र हात मध्ये आल्याने हातची बोटे तुटून पडली, असे कल्पिता पिंपळे यांनी सांगितले.

हल्ला करणारा भाजी विक्रेता अमरजित यादव याला पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने त्याला ४ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या फेरीवाल्यांना शोधून त्यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे पोलीस आयुक्तांना दिले आहेत.

Exit mobile version