२६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील प्रमुख सूत्रधार तहव्वूर हुसेन राणा याचे गुरुवारी अमेरिकेतून भारतात यशस्वी प्रत्यार्पण झाले. तहव्वूर राणा हा विशेष विमानाने नवी दिल्ली येथे पोहचताच राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) सायंकाळी त्याला औपचारिकरित्या अटक केली. यानंतर त्याला एनआयएच्या विशेष न्यायालयासमोर हजर करण्यात आले. शुक्रवार, ११ एप्रिल रोजी विशेष एनआयए न्यायालयाने तहव्वूर राणाला १८ दिवसांच्या एनआयए कोठडीत पाठवले. यामुळे आता त्याच्या चौकशीतून अनेक खुलासे होण्याची शक्यता आहे.
२००८ च्या मुंबई हल्ल्यात सहभागी असल्याचा आरोप असलेला तहव्वूर राणा सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास एका विशेष विमानाने दिल्लीत पोहोचला. पोहोचताच तपास यंत्रणेने त्याला अटक केली. मुंबई हल्ल्यातील आरोपी तहव्वूर हुसेन राणाला गुरुवारी संध्याकाळी तहव्वुर राणाला विशेष एनआयए न्यायालयासमोर हजर करण्यात आले. दहशतवादविरोधी संस्थेने २६/११ मुंबई हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणा याने पाठवलेल्या ईमेलसह त्याच्या पोलिस कोठडीचे समर्थन करण्यासाठी ठोस पुरावे सादर केले. एजन्सीने न्यायालयाला माहिती दिली की भयंकर असा हा हल्ल्याचा कट उघड करण्यासाठी कोठडीत त्याची चौकशी करणे महत्त्वाचे आहे. तपासकर्ते दहशतवादी हल्ल्यामधील राणाच्या भूमिकेची देखील तपासणी करतील.
पालम टेक्निकल विमानतळावर पोहोचल्यानंतर लगेचच, राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) त्याच्या अटकेची पुष्टी केली. “विमानतळावरील एनआयएच्या तपास पथकाने सर्व आवश्यक कायदेशीर औपचारिकता पूर्ण केल्यानंतर, विमानातून बाहेर पडल्यानंतर, शिकागो (अमेरिका) येथे राहणारा पाकिस्तानी वंशाचा कॅनेडियन नागरिक राणा याला अटक केली,” असे तपास संस्थेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. त्यानंतर, गुरुवारी रात्री उशिरा राणाला दिल्लीतील पटियाला हाऊस न्यायालयात विशेष एनआयए न्यायाधीशांसमोर हजर करण्यात आले. एनआयएने ईमेलसह ठोस पुरावे देऊन राणाला २० दिवसांची कोठडी मागितली. न्यायालयाने १८ दिवसांच्या कोठडीला मान्यता दिली आहे.
हे ही वाचा:
२६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्यातील सूत्रधार तहव्वूर राणाला अटक
आयडीएफच्या हवाई हल्ल्यात हमास बटालियन कमांडरसह अनेक जण ठार!
पु. ल. देशपांडे कला अकादमीतील नवीन संकुलाचे ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ नामकरण
गृहमंत्री शाह रायगड दौऱ्यावर, सुनील तटकरेंच्या निवासस्थानी करणार भोजन!
एनआयएच्या म्हणण्यानुसार, भारत- अमेरिका प्रत्यार्पण करारांतर्गत सुरू केलेल्या कार्यवाहीनुसार राणाला अमेरिकेत न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले होते. राणाने हा निर्णय रोखण्यासाठी सर्व कायदेशीर मार्ग वापरल्यानंतर अखेर प्रत्यार्पण करण्यात आले. राणावर डेव्हिड कोलमन हेडली उर्फ दाऊद गिलानी आणि लष्कर-ए-तैयबा (एलईटी) आणि हरकत-उल-जिहादी इस्लामी (एचयूजी) या दहशतवादी संघटनांच्या सदस्यांसह २००८ मध्ये मुंबईवरील विनाशकारी दहशतवादी हल्ल्यांचा कट रचल्याचा आरोप आहे. या प्राणघातक हल्ल्यांमध्ये एकूण १६६ जण ठार झाले आणि २३८ हून अधिक जखमी झाले. भारत सरकारने बेकायदेशीर कारवाया (प्रतिबंध) कायदा, १९६७ अंतर्गत एलईटी आणि एचयूजी या दोघांनाही दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले आहे, असे एनआयएने म्हटले आहे.