कोलकातामधील जाधवपूर विद्यापीठात पहिल्या वर्षात शिकणाऱ्या स्वप्नोदीप कुंडू याचा वसतिगृहाच्या दुसऱ्या मजल्यावरील बाल्कनीमधून पडून संशयास्पद मृत्यू झाला होता. या प्रकरणाच्या तपासात कोलकाता पोलिसांना स्वप्नोदीपच्या डायरीतून एक पत्र सापडले आहे. हे पत्र स्वप्नोदीपने विद्यापीठाच्या डीनना लिहिले होते.
हे पत्र स्वप्नोदीपनेच लिहिले असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. या पत्रात त्याने विद्यापीठात रॅगिंग होत असून वरिष्ठ विद्यार्थ्यांकडून त्याचा छळ होत असल्याची तक्रार डीनकडे केली होती. रुद्र नावाच्या वरिष्ठ विद्यार्थ्याने त्याला धमकावल्याचा आरोप पत्रात करण्यात आला आहे. तसेच, त्याला वरिष्ठांची आज्ञा पाळण्यास तसेच, धूम्रपान करण्यास सांगण्यात आले होते, असा दावाही करण्यात आला आहे.
या पत्रात केलेल्या आरोपांनुसार, या विद्यार्थ्याने त्यांची आज्ञा न पाळल्यास त्याला छतावरून खाली ढकलून देण्याचाही इशारा दिला होता. पोलिस या पत्राची कसून तपासणी करत आहेत. या पत्रावर स्वप्नोदीपचे नाव आणि त्याची स्वाक्षरीही आहे. मात्र हे अक्षर आणि स्वाक्षरी त्याचीच आहे की नाही, याची पडताळणी केली जाणार आहे. तसेच, हे पत्र त्याने स्वत:च्या मनाने लिहिले की, हे आरोप करण्यासाठी त्याच्यावर दबाव टाकण्यात आला होता, याची शहानिशाही पोलिस करणार आहेत.
हे ही वाचा:
सहा वर्षांत पहिल्यांदाच वेस्ट इंडिजने भारताविरुद्ध टी-२० मालिका जिंकली
इराणमधील प्रमुख शिया धार्मिक स्थळावर गोळीबार
माझ्या पुतण्याला भेटायला काय हरकत आहे?
‘जेलर’ चित्रपटाने पार केला २५० कोटींचा गल्ला!
‘यातील सर्वांत संशयास्पद बाब म्हणजे पत्रावरची तारीख. या पत्रावर १० ऑगस्ट ही तारीख नमूद करण्यात आली आहे. स्वप्नोदीपचा मृत्यू ९ ऑगस्ट रोजी रात्री पावणेबाराच्या सुमारास झाला होता. त्यामुळे त्याने दुसऱ्या दिवशीची तारीख का लिहिली असावी, याचाही तपास पोलिस करत आहेत. सध्या हे पत्र पोलिसांनी जप्त केले आहे. स्वप्नोदीपच्या हस्ताक्षराचे नमुने त्याच्या घरातून जप्त करण्यात आले आहेत. त्यामुळे ते अक्षर आणि या पत्रामधील अक्षराची पडताळणी केली जाणार आहे.
रुद्र हा कॉलेजमधील विरोधी गटातील तरुण आहे. त्याला अटकही करण्यात आली आहे. त्यामुळे कोणाला तरी गोवण्यासाठी किंवा कोणाची तरी सुटका करण्यासाठी हे पत्र लिहिण्यात आलेले नाही ना, या दृष्टीनेही पोलिस तपास करत आहेत.