जम्मू- काश्मीरमध्ये सध्या विधानसभा निवडणूक सुरू असून दहा वर्षांनी पार पाडणाऱ्या निवडणुकांमध्ये मतदारांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. अशातच जम्मू- काश्मीर राज्य निवडणूक आयोगाने कारवाई करत काही सरकारी अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे. आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. याशिवाय १३० कोटी रुपयेही जप्त करण्यात आले आहेत.
जम्मू- काश्मीरमध्ये मतदानाचे दोन टप्पे पार पडले असून सुरक्षेच्या कारणावरून या ठिकाणी सुरक्षा यंत्रणाही मोठ्या संख्येने तैनात करण्यात आली आहे. अशातच आता राज्य निवडणूक आयोगाने मोठी कारवाई केली आहे. आदर्श आचारसंहिता (एमसीसी) मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याप्रकरणी २३ सरकारी अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. तसेच अंमलबजावणी एजन्सींमार्फत एकूण १३० कोटी रुपये जप्त केले आहेत.
जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीदरम्यान २० कर्मचाऱ्यांची त्यांच्या सध्याच्या कार्यालयातून इतर तहसील आणि जिल्ह्यांतील कार्यालयांमध्ये बदली करण्यात आली आहे. या कर्मचाऱ्यांच्या विरोधात राजकीय पक्षाच्या बाजूने काम केल्याबद्दल तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत. याशिवाय, आयोगाने एमसीसी मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याबद्दल सहा कंत्राटी आणि इतर कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त केले होते.
दरम्यान, निवडणूक कार्यालयाने माहिती दिली की विविध अंमलबजावणी संस्थांनी एकूण १३० कोटी रुपये जप्त केले आहेत, ज्यामध्ये पोलीस विभागाने सर्वाधिक १०७.५० कोटी रुपये जप्त केले आहेत. त्यानंतर केंद्रीय वस्तू आणि सेवा कर विभागाने ९.८८ कोटी रुपये जप्त केले आहेत. राज्याच्या वस्तू व सेवा कर विभागाने ८.०३ कोटी रुपये, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने २.०६ कोटी रुपये, प्राप्तिकर विभागाने ८७ लाख रुपये आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाने ५० लाख रुपये जप्त केले.
हे ही वाचा :
कानपूरमध्ये पुन्हा ट्रेन उलटवण्याचा कट, रुळावर सापडला ‘अग्निसुरक्षा सिलेंडर’
सुनीता विल्यम्स यांचा पृथ्वीवर येण्याचा मार्ग मोकळा; नासाची टीम अंतराळात पोहोचली
इस्रायलने बेरूतमध्ये केलेल्या हल्ल्यात चार जण ठार
लिहून घ्या राहुल गांधी कधीही पंतप्रधान होत नाहीत…
जम्मू-काश्मीरचे मुख्य निवडणूक अधिकारी (सीईओ) पीके पोल यांच्या म्हणण्यानुसार, विविध राजकीय पक्ष आणि उमेदवारांना रॅली, मिरवणुका, पक्ष कार्यालये उघडणे, वाहने, बॅनर, झेंडे, पॅम्प्लेट, होर्डिंग्ज, रस्त्यावरील कोपऱ्यांचे प्रदर्शन यासाठी सुमारे ७,०८८ परवानग्या देण्यात आल्या आहेत. आचारसंहिता उल्लंघन केल्या प्रकरणी उमेदवार, राजकीय पक्ष, मीडिया हाऊस आणि इतरांविरुद्ध ११५ नोटीस जारी केल्या आहेत.