राजस्थान पोलीस आणि लष्कराने संयुक्त कारवाई करून पाकिस्तानच्या आयएसआयशी संपर्क असलेल्या संशयिताला अटक केली आहे. या संयुक्त कारवाईत बिकानेरच्या फायरिंग रेंजमध्ये एका संशयिताला अटक करण्यात आली आहे. पोलिसांना संशय आहे की, ताब्यात घेण्यात आलेल्या तरुणाचे नाव विक्रम सिंग (वय ३१, रा. लखासर, श्रीडुंगरगड) असून पाकिस्तानी गुप्तचर संस्थेच्या आयएसआय एजंटशी त्याचे संबंध आहेत. तपास यंत्रणांनी संशयिताला सध्या चौकशीसाठी जयपूरला नेले आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, गेल्या वर्षभरापासून विक्रम सिंग हा बिकानेर येथील फायरिंग रेंजच्या ईस्ट कॅम्पमध्ये कॅन्टीन ऑपरेट करत होता. प्राथमिक तपासानुसार हे हनीट्रॅपचे प्रकरण असल्याचे समोर आले आहे. पाकिस्तानी आयएसआय एजंट अनिताने विक्रम सिंग याला हनीट्रॅप करून भारतातील महत्त्वाची गुप्त माहिती मिळवली असावी असा अंदाज आहे. तसेच पैशांचा व्यवहार करून माहिती घेण्यात आली का? याचाही तपास केला जात आहे. विक्रम सिंगच्या बँक खात्यांचीही चौकशी करण्यात येत आहे.
दरम्यान, विक्रम सिंगने राजस्थानच्या फायरिंग रेंजमधील नेमकी कोणती माहिती आयएसआयला पाठवली हा चिंतेचा विषय आहे. फायरिंग रेंजचे व्हिडीओ, फोटो, गुप्त माहिती आणि फायरिंग रेंज फिल्डमधील परकीय शत्रुत्वाची गुप्त पाकिस्तानला पाठवली आहे का? याचा तपास भारतीय तपास यंत्रणेकडून करण्यात येत आहे.
हे ही वाचा:
२० भारतीय अजूनही रशियात, त्यांच्या सुटकेसाठी भारत सरकार प्रयत्नशील!
अखेर शाहजहां शेख सहा वर्षांसाठी झाला निलंबित
धरमशाला कसोटीत केएल राहुल बाहेर; बुमराहचे पुनरागमन
“सलीम कुत्तासोबत नाचणाऱ्या बडगुजरांचे संजय राऊत गॉडफादर”
अतिरिक्त पोलीस गुप्तचर महासंचालक संजय अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित विक्रम सिंग हा आयएसआय एजंट अनिताशी कॉलर आयडी स्पूफिंगच्या माध्यमातून पाच ते सहा वेळा बोलला आहे. भारतातून पाकिस्तान आणि परदेशात कोणत्या प्रकारची महत्त्वाची माहिती पाठवण्यात आली, याचा शोध घेण्याचा प्रयत्न सध्या करत आहे.