गेल्या अनेक दिवसांपासून फरार असलेला वाल्मिक कराड याने मंगळवारी पुण्यातील सीआयडीच्या मुख्यालयामध्ये आत्मसमर्पण केलं. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड याचा हात असल्याचा आरोप केला जात असून त्याच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल आहे.
वाल्मिक कराड मंगळवारी सीआयडीच्या कार्यालयात शरण आल्यानंतर त्याला विशेष सुरक्षेत केज येथे नेण्यात आले. वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्याला केज न्यायालयात हजर करण्यात आले. सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी कराडवर खंडणीसह हत्या प्रकरणाचा आरोप असल्याचं सांगत त्याच्या कोठडीची मागणी केली. सरकारी पक्ष आणि बचाव पक्षाचा युक्तिवाद ऐकून केज न्यायालयाने वाल्मिक कराडला १४ दिवसांची सीआयडी कोठडी सुनावली आहे. वाल्मिक कराड याला १४ दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश केजच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्रीमती ए. व्ही. पावसकर यांनी दिले आहेत.
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आणि पवन ऊर्जा कंपनीला खंडणी मागितल्या प्रकरणी फरार असलेला वाल्मिक कराडने आत्मसमर्पण केलं. तब्बल दोन आठवडे वाल्मीकने पोलिसांना गुंगारा दिला होता. शरण येण्यापूर्वी त्याने व्हिडिओ पोस्ट करत, माझ्यावर केज पोलिस ठाण्यात खंडणीचा खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मला अटकपूर्व जामीन मिळवण्याचा अधिकार असतांना देखील पुण्यातील सीआयडी ऑफिसमध्ये आत्मसमर्पण केलं आहे. संतोष भैया देशमुख यांचे जे कोणी मारेकरी असतील त्यांना अटक करावी व त्यांना फाशीची शिक्षा द्यावी. राजकीय द्वेषापोटी माझं नाव या घटनेशी जोडले जात आहे. जर पोलिस तपासात यात मी दोषी आढळलो तर मी शिक्षा भोगायला तयार आहे, असे कराड याने म्हटले.
हे ही वाचा :
ऑक्टोबर २०२३ च्या हल्ल्यामागील हमासचा प्रमुख कमांडर ड्रोन हल्ल्यात ठार
पाकिस्तानमध्ये दहशतवाद विरोधी आंदोलनाला हिंसक वळण; पोलिसांचा गोळीबार
मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्ग प्राधान्याने पूर्ण करणार
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी २.० च्या प्रकल्पास गती द्यावी!
सुदर्शन घुले हा वाल्मीक कराडच्या सांगण्यावरून काम करायचा. सुदर्शन घुले अद्याप फरार आहे. कॉलवरील आवाज वाल्मीक कराडचा आहे का, हे तपासायचं असल्याचे सरकारी वकिलांनी न्यायालयाला सांगितले. मुख्य आरोपी सुदर्शन घुले फरार असून वाल्मिक कराडची कोठडी महत्त्वाची असल्याचे वकिलांनी सांगितले. तर, वाल्मिक कराड सामाजिक कार्यकर्ते, गरीब राजकारणी असून खंडणीचा गुन्हा दाखल झाला म्हणून कोठडी मागणे चुकीचे आहे. केवळ राजकीय द्वेषापोटी हत्या प्रकरणात वाल्मिक कराडला गोवण्यात आले आहे. आवाजाचे नमुने देण्यास तयार आहे, पण कोठडी देऊन नका. त्यांना न्यायालयीन कोठडी द्या, असा युक्तिवाद वाल्मिक कराडच्या वकिलांनी केला.