गडचिरोलीत दोन महिला माओवाद्यांचे आत्मसमर्पण; १६ लाखांचे होते बक्षीस

आत्मसमर्पण केलेल्या महिला होत्या माओवाद्यांच्या कंपनी क्रमांक १० च्या कमांडर

गडचिरोलीत दोन महिला माओवाद्यांचे आत्मसमर्पण; १६ लाखांचे होते बक्षीस

गडचिरोलीमध्ये माओवाद्यांच्या दोन महिला कमांडरनी पोलिसांपुढे आत्मसमर्पण केल्याची माहिती समोर आली आहे. माओवाद्यांच्या कंपनी क्रमांक १० च्या दोन महिला सेक्शन कमांडरनी गुरुवार, २७ जून रोजी गडचिरोली पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले. या दोन्ही कमांडरवर सरकारने १६ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. माओवाद्यांकडून होणाऱ्या सततच्या आत्मसमर्पणामुळे माओवादी चळवळीला धक्का बसत असल्याचे म्हटले जात आहे.

माओवाद्यांच्या कंपनी क्रमांक १० ची एरिया कमिटी सदस्य तथा प्लाटून पार्टी कमिटी सदस्य बाली उर्फ रामबत्ती उर्फ झरीना नरोटे (वय २८ वर्षे) रा. झारेवाडा (एटापल्ली), प्लाटून पार्टी कमिटी सदस्य तथा एरिया कमिटी सदस्य शशीकला उर्फ चंद्रकला उर्फ सुनंदा उर्फ मनीषा उईके (वय २९ वर्षे) रा. कटेझरी (धानोरा) अशी आत्मसमर्पण केलेल्या महिला माओवाद्यांची नावे आहेत.

बाली नरोटे ही २०१० मध्ये गट्टा दलममध्ये सदस्य म्हणून भरती झाली. याच वर्षी तिला अहेरी दलममध्ये बदली मिळाली. २०१६ मध्ये अहेरी दलममधून कंपनी क्रमांक दहामध्ये बदली झाली. यानंतर २०२१ मध्ये तिला प्लाटून पार्टी कमिटी सदस्य व एरिया कमिटी सदस्य म्हणून बढती देण्यात आली होती. तिच्यावर २१ गुन्हे दाखल आहेत. यात दहा चकमकी, एक जाळपोळ, एक अपहरण आणि इतर नऊ गुन्ह्यांचा समावेश आहे.

शशीकला उईके ही २०११ मध्ये टिपागड दलममध्ये सदस्यपदावर भरती झाली. २०१३ मध्ये टिपागड दलममधून कंपनी क्रमांक ४ मध्ये आणि २०२१ मध्ये कंपनी क्रमांक ४ मधून कंपनी १० मध्ये बदली झाली. २०२३ मध्ये प्लाटून पार्टी कमिटी सदस्य व एरिया कमिटी सदस्य झाली. तिच्यावर आठ गुन्हे दाखल आहेत. यात सहा चकमकी आणि दोन इतर गुन्ह्यांचा समावेश आहे.

हे ही वाचा:

दिल्लीतील विमानतळाच्या टर्मिनल- १ चे छत कोसळून सहा जण जखमी

“मुंबई शिक्षक, पदवीधर निवडणुकीत उबाठा सेनेने पैशाचा धुमाकूळ मांडला”

नीट पेपरलीक प्रकरणी सीबीआयची बिहारमधून पहिली अटक, दोघेजण ताब्यात!

आरक्षण प्रश्नासंबंधित २९ जूनला मुंबईत सर्वपक्षीय बैठक

आत्मसमर्पणाची प्रक्रिया पोलिस महानिरीक्षक (नक्षलविरोधी अभियान) संदिप पाटील, पोलिस उपमहानिरीक्षक (नक्षलविरोधी अभियान) अंकित गोयल, पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनात पार पडली. राज्य सरकारने २००५ पासून आत्मसमर्पण योजना जाहीर केली. या योजनेंतर्गत हिंसाराचाला कंटाळून अनेक जहाल माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. आतापर्यंत एकूण ६६६ माओवाद्यांनी गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले आहे.

Exit mobile version