हा तर नागरिकांच्या विश्वासाला तडा; निठारी हत्याकांड तपासप्रकरणी न्यायालयाचे ताशेरे

प्रमुख आरोपींची सोमवारी उच्च न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली.

हा तर नागरिकांच्या विश्वासाला तडा; निठारी हत्याकांड तपासप्रकरणी न्यायालयाचे ताशेरे

निठारी प्रकरणात अटक, पुरावे जमा करणे आणि कबुलीजबाब या महत्त्वाच्या बाबी ज्या निष्काळजीपणे हाताळल्या गेल्या, ते सर्वांत निराशाजनक होते. त्यामुळे नागरिकांच्या विश्वासाला तडा गेला, असे ताशेरे अलाहाबाद उच्च न्यायालयाने सोमवारी तपास यंत्रणेवर मारले. कुख्यात निठारी हत्याकांडातील दोन प्रमुख आरोपींची सोमवारी उच्च न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. न्यायालयाने आरोपी सुरिंदर कोहलीला त्याच्याविरुद्धच्या १२ खटल्यांमध्ये निर्दोष ठरवले, तर सहआरोपी मोनिंदरसिंग पंढेर हा त्याच्याविरुद्धच्या दोन खटल्यांमध्ये निर्दोष ठरला.

 

सन २००६मधील निठारी हत्याकांडाचा तपास ज्या प्रकारे केला गेला, त्याबद्दल निराशा व्यक्त करत जबाबदार तपास यंत्रणांनी जनतेच्या विश्वासाला तडा दिला, असे ताशेरे न्यायालयाने ओढले. अटक, पुरावे जमा करणे आणि कबुलीजबाब या महत्त्वाच्या बाबी ज्या हलगर्जी आणि निष्काळजीपणे हाताळल्या गेल्या आहेत, ते सर्वांत निराशाजनक आहे, अशी टिप्पणी त्यांनी केली. अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे कोहली आणि पंढेर यांना सत्र न्यायालयाकडून मिळालेली फाशीची शिक्षा रद्द करण्यात आली आहे.

 

‘भारत सरकारच्या महिला आणि बाल विकास मंत्रालयाने स्थापन केलेल्या उच्चस्तरीय समितीने केलेल्या विशिष्ट शिफारसी असूनही, अवयव व्यापाराच्या संभाव्य सहभागाची चौकशी करण्यात तपासात अपयश आले. निठारी हत्या ही जबाबदार तपास यंत्रणेकडून नागरिकांच्या विश्वासाला तडा देण्यासारखेच आहे,’ असे उच्च न्यायालयाच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

हे ही वाचा:

सागरी व्यापार क्षेत्रातील गुंतवणूकदारांना भारतात मोठी संधी

मुंबईतील सोने तस्करी करणाऱ्या टोळीचा डीआरआयकडून पर्दाफाश

पैसे घेऊन विचारले प्रश्न; खा. मोईत्रा यांच्यावर अदानी समूहाचे आरोप

अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन बुधवारी इस्रायलच्या दौऱ्यावर

तपास व्यवस्थित करण्यात आलेला नाही आणि पुरावे जमा करण्याच्या मूलभूत नियमांचे ‘निर्लज्जपणे उल्लंघन’ केले गेले आहे, असेही उच्च न्यायालयाने नमूद केले आहे. ‘अवयव व्यापाराच्या संघटित गुन्हेगारीच्या संभाव्य सहभागाच्या अधिक गंभीर बाबींचा तपास न करता, घरातील गरीब नोकराला अडकवण्याचा सोपा मार्ग तपासात निवडला गेला आहे,’ अशी टीकाही उच्च न्यायालयाने केली.

 

काय आहे निठारी हत्या प्रकरण?

 

नोएडा येथे २००५, २००६ या कालावधीत हे हत्याकांड घडले होते. अनेक लहान मुले आणि तरुणीं बेपत्ता झाल्याने तेथे मोठी खळबळ उडाली होती. उद्योजक असणाऱ्या पंधेरच्या निठारी येथील निवासस्थानाच्या मागील बाजूच्या नाल्यातून २९ डिसेंबर २००६ रोजी आठ मुलांच्या मृतदेहांचे सांगाडे हाती लागले, तेव्हा हे प्रकरण उघडकीस आले. या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे वर्ग करण्यात आला. या मुलांचे अपहरण, लैंगिक अत्याचार करून त्यांची हत्या करण्यात आली. घरकाम करणारा कोहली आणि हे गुन्हे घडलेल्या घराचा मालक पंधेर हे मुख्य संशयित होते. कोहली हा मुलांना मिठाई आणि चॉकलेटचे आमिष दाखवून घरात आणायचा, असा आरोप करण्यात आला. त्यानंतर तो त्यांची हत्या करायचा, त्यांच्या मृतदेहांशी लैंगिक संबंध ठेवायचा, त्यांचे तुकडे करायचा आणि शरीराचे अवयव शिजवून खायचा, तो हाडे आणि शरीराचे इतर अवयव घराच्या मागे असलेल्या नाल्यात किंवा उघड्या अंगणात टाकत असे, असेही आरोपपत्रात नमूद करण्यात आले होते.

Exit mobile version