मनसुख हिरेन हत्या प्रकरणात सुनिल माने यांना बेड्या

मनसुख हिरेन हत्या प्रकरणात सुनिल माने यांना बेड्या

अँटिलिया समोरील स्फोटकांचे प्रकरण आणि त्याच्याशी निगडीत मनसूख हिरेन यांची हत्या, या दोन्ही केसेसचा तपास करत असलेल्या राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) पोलिस निरीक्षक सुनिल माने यांना अटक केली आहे. सुनिल माने हे मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या (क्राईम ब्रांच) युनिट ११चे प्रमुख होते. सध्या त्यांची सशस्त्र पोलीस दलात बदली करण्यात आली होती.

गेल्या महिन्यात सुनील माने यांची चौकशी करण्यात आली होती. ही चौकशी दहशतवाद विरोधी पथकाच्या काळाचौकी युनिटमध्ये करण्यात आली होती. त्यानंतर मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास एनआयएकडे हस्तांतरित करण्यात आला होता. आता सुनील मानेंना एनआयएने या प्रकरणात अटक केली आहे.

हे ही वाचा:

‘आशिकी’चा सूर हरपला

विरारचे जळीत कांड ही नॅशनल न्यूज नाही, आरोग्यमंत्र्यांचे निबर विधान

विरार दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना मोदींचा मदतीचा हात

विरारच्या विजय वल्लभ हाॅस्पिटलमध्ये अग्नितांडव

मनसुख हिरेन यांची पत्नी विमल हिरेन यांनी माध्यमांशी बोलताना त्यांची हत्या झाली असल्याचा दावा त्यांचा मृतदेह मिळाल्यानंतर केला होता. आपल्या पतीला कांदिवली क्राईम ब्रांचमधून फोन आला होता, आणि चौकशीसाठी बोलावलं होतं, असं देखील त्यांनी यावेळी सांगितलं होतं.

मनसुख हिरेन यांची हत्या घडली त्या रात्री नेमकं काय घडलं? याचे पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत. निलंबित पोलीस कर्मचारी विनायक शिंदे आणि नरेश गोर या दोघांच्या चौकशीतून एनआयएच्या हाती अनेक पुरावे आले आहेत. या प्रकरणात अनेक गाड्या फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवल्या होत्या. त्यातून काही गोष्टी समोर आल्या आहेत. या प्रकरणाचे नाट्यरुपांतर देखील वेळोवेळी करण्यात आले.

त्या रात्री आरोपींनी हिरेन यांच्या नाकावर जबरदस्ती क्लोरोफॉर्म टाकण्यात आलं. त्यामुळे हिरेन तात्काळ बेशुद्ध पडले. त्यानंतर आरोपींनी त्यांची हत्या करण्यात आली असं काही सूत्रांनी सांगितलं आहे. पोस्टमार्टमच्या रिपोर्टनुसार हत्येपूर्वी हिरेन यांच्या चेहऱ्यावर मार लागलेला होता. त्यांच्या चेहऱ्याच्या डाव्या बाजूला मार लागलेला होता. मृत्यूपूर्वी हा मार लागलेला होता. तसेच त्यांच्या अंगावर काही ठिकाणी मार होता. विशेषत: डोक्यालाही मार लागलेला होता, असं सूत्रांनी सांगितलं.

हिरेन यांची हत्या सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांच्या समोरच करण्यात आली. त्यानंतर वाझे यांच्या समोरच हिरेन यांचा मृतदेह मुंब्र्याच्या खाडीत फेकण्यात आला असावा अशी शक्यताही सूत्रांनी वर्तवली आहे.

Exit mobile version