मराठा आरक्षणासाठी मुंबईत आलेल्या जालना जिल्ह्यातील ४५ वर्षीय व्यक्तीने वांद्रे पूर्व येथून बीकेसीला कनेक्ट होणाऱ्या उड्डाणपूलाला गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी पहाटे समोर आली आहे.
सुनील बाबुराव कावळे असे आत्महत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव असून त्याच्यासोबत असलेल्या बॅगेत खेरवाडी पोलिसांना ३ पानांची सुसाईड नोट मिळाली आहे. या सुसाईड नोट मध्ये २४ ऑक्टोबर रोजी मुंबईत होणाऱ्या मराठा आरक्षण आंदोलनाकरिता मराठा समाजातील लोकांना मुंबईमध्ये एकत्रित होण्याबाबत आवाहन करण्यात आले आहे, तसेच शेवटी त्याने सर्वांची माफी देखील मागितली आहे.
खेरवाडी पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन सायन रुग्णालय येथे शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून या प्रकरणी अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे. वांद्रे पूर्व रेल्वे उड्डाणपूल येथून बीकेसी ला कनेक्ट होणाऱ्या पुलावरून खाली एका व्यक्ती लटकत असल्याची माहिती बुधवारी मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमारास खेरवाडी पोलिसांना मिळाली.खेरवाडी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठून स्थानिकांच्या मदतीने त्या व्यक्तीला खाली उतरवून तात्काळ सायन रुग्णालयात पाठविण्यात आला, डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले.
हे ही वाचा:
थरूर केरळात रिमझिमले पण, महाराष्ट्रात ठाकरे का सुखावले?
स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनी राष्ट्रपतींच्या गावी पोहचणार रेल्वे
इस्रायलचा संबंध नाही; मुस्लिम जिहादी संघटनेच्या रॉकेटचा वेध चुकल्यानेच रुग्णालयात स्फोट
गाझा पट्टीतील रूग्णालयावरील हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदी काय म्हणाले?
दरम्यान खेरवाडी पोलिसांना त्या व्यक्तीजवळ मिळून आलेल्या बॅगेत तीन पानांची सुसाईड नोट आणि ओळख पत्र मिळून आल्यामुळे मृत व्यक्तीची ओळख पटविण्यात आली. सुनील बाबुराव कावळे(४७)असे मृताचे नाव असून तो जालना जिल्ह्यातील तालुका अंबड मुक्काम पोस्ट चिकनगाव असे असल्याचे समोर आले.
पोलिसांना मिळून आलेल्या सुसाईड नोटवरून सुनील कावळे हा मराठा आरक्षण आंदोलनातील कार्यकर्ता असल्याचे समोर आले, २४ ऑक्टोबर रोजी मुंबईत होणाऱ्या मराठा आरक्षण आंदोलनासाठी तो मुंबईत आला होता. मराठा आरक्षणासाठी मराठा समाजाने एकत्र यावे, कोणी काही बोलू द्या त्यांच्याकडे लक्ष देऊ नका, २४ ऑक्टोबर रोजी मुंबईत होणाऱ्या मराठा आरक्षण आंदोलनासाठी सर्वांनी एकत्रित यावे असे लिहून शेवटी मला मोठ्या मनाने माफ करा, मी क्षमा मागतो सर्वांनी मला माफ कराअसे सुसाईड नोट मध्ये लिहण्यात आले आहे. या प्रकरणी खेरवाडी पोलिसांनी सुसाईड नोट ताब्यात घेवुन अपमृत्यूची नोंद केलेली असून अधिक तपास सुरू आहे.