स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. राहुल गांधी यांना पुणे न्यायालयाने समन्स बजावले असून हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. राहुल गांधी यांना सोमवारी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, ते निवडणूक प्रचारात व्यस्त असल्याने न्यायालयात हजर राहू शकले नाहीत, असे त्यांच्या वकिलांनी न्यायालयात सांगितले. त्यानंतर राहुल गांधी यांना २ डिसेंबर रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
लंडन येथील एका कार्यक्रमात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी राहुल गांधी यांनी अवमानकारक वक्तव्य केले होते. त्यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू सात्यकी सावरकर यांनी पुण्यातील न्यायालयात अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी राहुल गांधी यांच्याविरुद्ध दावा दाखल केला होता. दरम्यान, १८ नोव्हेंबरला न्यायालयात यावर सुनावणी झाली परंतु, निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त असलेल्या राहुल गांधी यांना सुनावणीसाठी हजर राहता आले नाही. त्यामुळे येत्या २ डिसेंबरला पुण्याच्या विशेष न्यायालयात हजर राहण्याचे आदेश न्यायदंडाधिकारी अमोल शिंदे यांनी दिले आहेत.
राहुल गांधींना न्यायालयात हजर होण्याबाबत यापूर्वी पाठवलेले समन्स दिल्लीतील तीस हजारी न्यायालयाऐवजी पातियाळा येथील न्यायालयात पोहोचल्याने ते पुन्हा पुण्यातील न्यायालयात पाठविण्यात आले होते. त्यानंतर गांधी यांना पुन्हा समन्स बजाविण्यात आले. त्यानुसार राहुल गांधी यांना सोमवारी (१८ नोव्हेंबर) न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते.
फिर्यादी यांचे वकील संग्राम कोल्हटकर यांनी राहुल गांधी यांना न्यायालयाकडून समन्स मिळूनही ते हजर झाले नाहीत त्यामुळे राहुल गांधी यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट काढावे अशी मागणी त्यांनी केली. राहुल गांधी यांच्या वतीने मिलिंद पवार हे न्यायालयासमोर बाजू मांडत आहेत. राहुल गांधी यांना कोणत्याही प्रकारची सहानुभूती दाखवण्यात येऊ नये. २ डिसेंबरला न्यायालयात हजर होणे अनिवार्य असेल अन्यथा त्यांना अटक करून न्यायालयासमोर हजर केले जाऊ शकते अशी माहिती सात्यकी सावरकर यांचे वकील संग्राम कोल्हटकर यांनी दिली आहे.
हे ही वाचा:
आता विमानातही मिळणार इंटरनेट; अत्याधुनिक कम्युनिकेशन सॅटॅलाइट GSAT- N2 चे यशस्वी उड्डाण!
मणिपूर: केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाच्या अतिरिक्त ५० तुकड्या होणार तैनात
विधानसभा निवडणुकांचा अंदाज व्यक्त करतायत ही वक्तव्यं…
आपमधून नाराज होऊन बाहेर पडल्यानंतर कैलाश गेहलोत यांचा भाजपमध्ये प्रवेश!
प्रकरण काय?
सात्यकी सावरकर यांनी कोर्टात दाखल केलेल्या याचिकेत दावा केलाय की, राहुल गांधी हे मार्च २०२३ साली लंडनमधील एका कार्यक्रमाला संबोधित करत होते. तेव्हा ते म्हणाले की, सावरकर यांच्या पुस्तकात असा उल्लेख आहे की, त्यांनी आणि त्यांच्या ५- ६ मित्रांनी मिळून एका मुस्लीम व्यक्तीला मारहाण केली होती तेव्हा सावरकर खुश झाले होते. याचिकाकर्त्यांनुसार सावरकर यांनी कधीही अशाप्रकारे काही लिहिल्याचा उल्लेख नाही असं सांगत सात्यकी सावरकर यांनी राहुल गांधींविरोधात मानहानीचा खटला दाखल केला.