‘१५ कोटी रुपयांसाठी केजरीवाल १५ कोटींचे तूप असा शब्द वापरतात’

महाठग सुकेश चंद्रशेखरने केला खळबळजनक दावा

‘१५ कोटी रुपयांसाठी केजरीवाल १५ कोटींचे तूप असा शब्द वापरतात’

अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला फसवणारा महाठग सुकेश चंद्रशेखरने आता थेट दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनाच वादात ओढले आहे. मनीलाँड्रिंग, भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या चंद्रशेखरने केजरीवाल यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा दक्षिण भारतातील एक समूह आणि बीआरएस पक्षाशी संबंध आहेत. अरविंद केजरीवाल यांच्याशी आपले चॅटिंग झाले होते. त्यात त्याने मला १५ कोटी रुपये टीआरएस (तेलंगणा राष्ट्र समिती आणि आता भारत राष्ट्र समिती तथा बीआरएस) कार्यालयाला पाठविण्यास सांगितले होते. त्याला केजरीवाल यांनी १५ किलो तूप असा कोड वापरला होता. तो आपले सहकारी अरुण पिल्लई यांना सोपविण्यास सांगितले होते. पिल्लई हे पैसे काळ्या रंगाच्या रेंज रोव्हरमध्ये ठेवतो. ही कार टीआरएस मुख्यालयात होती आणि त्यावर एमएलसी असा स्टिकर होता.

चंद्रशेखरने असा दावाही केला आहे की, या चॅटमध्ये टीआरएस नेत्यांनी पैसे मिळाल्याची पुष्टीही केलेली आहे. चंद्रशेखरने असाही दावा केला की, केजरीवाल आणि सत्येंद्र जैन या आम आदमी पार्टीच्या नेत्यांनी हे पैसे देण्याचे आदेश दिले होते.

सुकेश चंद्रशेखरने असा दावाही केला की, या सगळ्यांची नार्को, पॉलिग्राफ चाचणीही करून पाहा. माझीही चाचणी करा. त्यानंतर न्यायालयाने हे निश्चित करावे की, मी खरे बोलतो आहे अथवा नाही. मी तर पुरावाच देतो आहे. २०१५ ते २०२३पर्यंत सगळे पुरावे माझ्याकडे आहेत. एवढेच नाही तर केजरीवाल यांच्याशी व्हॉट्सअप, टेलिग्रामवर चॅट केल्याची ७०० पाने माझ्याकडे आहेत.

हे ही वाचा:

सांख्यिकी आयोगासाठी भारताची निवड; चीनलाही टाकले मागे

१५५ देशांतील नद्यांच्या पाण्याने करणार रामललाचा जलाभिषेक

महागडी बुलेट प्रूफ एसयूव्ही करणार सलमान खानचे संरक्षण

भिंद्रनवालेप्रमाणे दिसण्यासाठी अमृतपालने केली होती शस्त्रक्रिया

 

सुकेशने असा दावा केला की, २०२०मध्ये मी टीआरएसच्या कार्यालयात ७५ कोटी रुपये पोहोचवले होते. सुकेशने हे दावे केले असले तरी अधिकृतपणे कुणीही त्याच्या दाव्यांची पुष्टी केलेली नाही.

सुकेशने यापूर्वीही आम आदमी पार्टीच्या नेत्यांवर असे आरोप केलेले आहेत. सत्येंद्र जैन जे सध्या तुरुंगात आहेत त्यांच्यावरही त्याने आरोप केले होते. सुकेशने सत्येंद्र जैनकडून सुरक्षा पुरविण्यासाठी पैसे घेतल्याचेही म्हटले होते. आपच्या सर्व नेत्यांनी मात्र या दाव्यात तथ्य नसल्याचे नेहमी म्हटले आहे.    

Exit mobile version