मराठा समाजात जन्म झाला हा गुन्हा आहे का? म्हणत मराठा तरुणाची आत्महत्या

हिंगोलीमधील घटना

मराठा समाजात जन्म झाला हा गुन्हा आहे का? म्हणत मराठा तरुणाची आत्महत्या

राज्यात मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा पेटलेला असताना दुसरीकडे मराठा आरक्षणासाठी तरुण आत्महत्येसारखी गंभीर पावले उचलत आहेत. हिंगोली जिल्ह्यात एका तरुणाने मराठा आरक्षण मिळत नसल्याने आपले जीवन संपवले आहे. आत्महत्या करण्यापूर्वी या तरुणाने एक चिठ्ठी देखील लिहून ठेवली आहे. ज्यात, मराठा समाजात जन्म झाला हा माझा गुन्हा आहे काय? असा सवाल विचारला आहे. आदिनाथ राखोंडे (वय २७ वर्षे) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे.

हिंगोली जिल्ह्यातील आजरसोंडा येथील २७ वर्षीय आदिनाथ याने मराठा आरक्षणासाठी विजेच्या तारांना स्पर्श करत आत्महत्या केली. तो उच्चशिक्षित होता. मात्र, तरीही त्याला नोकरी मिळत नसल्याने तो चिंतेत होता. विशेष म्हणजे, मराठा आरक्षणाच्या आंदोलनामध्ये आदिनाथचा सहभाग होता. घरातील विजेच्या तारांना पकडून त्याने आपले जीवन संपवले आहे. त्याने सुसाईड नोटही लिहून ठेवली आहे.

“एक मराठा लाख मराठा… मी सतत बातम्या पाहत आहे आणि मला असे वाटत आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळू शकत नाही. माझे उच्च शिक्षण होऊनसुद्धा मला नोकरी मिळत नाही. माझ्या समाजाला न्याय मिळत नाही. त्यामुळे माझा मराठा समाजात जन्म झाला हा गुन्हा झाला आहे का? मी हतबल होऊन आज रात्री माझे जीवन संपवत आहे,” असे आदिनाथ याने चिठ्ठीत लिहून ठेवले आहे.

हे ही वाचा:

आयपीएस अधिकाऱ्यासह तीन पोलिसांवर विभागीय कारवाईचे निर्देश

आरक्षणाला विरोध करणाऱ्या तरुणाला मराठा आंदोलकांकडून चोप

झोपण्याची दोन इंच जागा कमी झाल्याने कैद्यांची न्यायालयात धाव

दुसरीकडे, मराठा आरक्षणासाठी छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यातील देवगाव रंगारी येथे देखील एकाने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्याने ३९ वर्षीय तरुणाने विषारी द्रव पिऊन स्वत:च्या शेतातील विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. बुधवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे. संजय साईनाथ सोनवणे असे तरुणाचे नाव आहे.

Exit mobile version