कोरोनामुळे कर्जबाजारी झालेल्या व्यवसायिकाने केली आत्महत्या

कोरोनामुळे कर्जबाजारी झालेल्या व्यवसायिकाने केली आत्महत्या

लॉकडाऊनमुळे कर्जबाजारी झालेल्या कॅटरिंग व्यवसायिकाने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना बुधवारी रात्री चेंबूर येथे घडली. या प्रकरणी गोवंडी पोलिसांनी अपमृत्यू नोंद केली असून तपास सुरू आहे. कोरोनाच्या काळात अनेकांचे व्यवसाय बंद पडले आणि अनेकांना नोकऱ्या सोडाव्या लागल्या किंवा त्यांना नोकरीवरून काढण्यात आले. त्यामुळे अशा उत्पन्नाचे साधन गमावलेल्यांमध्ये एकप्रकारची असुरक्षिततेची भावना आहे. त्यातून आत्महत्यांचे प्रमाणही वाढले आहे.

प्रकाश राठोड असे या आत्महत्या करणाऱ्या व्यवसायिका चे नाव आहे. चेंबूर घाटला परिसरात एका इमारतीत पत्नी आणि दोन मुलांसह राहणारे प्रकाश यांचा कॅटरिंगचा व्यवसाय होता. मात्र लॉकडाऊनच्या काळात लग्न सोहळे बंद असल्यामुळे प्रकाश राठोड यांचा कॅटरिंगचा व्यवसाय बंद असल्यामुळे त्यांना उपजीविका आणि कर्मचाऱ्याचा पगार देण्यासाठी कर्ज काढावे लागले होते.

कर्ज देणारे सतत मागे लागल्यामुळे अखेर प्रकाश यांनी बुधवारी रात्री राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी प्रकाश यांनी लिहून ठेवलेली चिठ्ठी पोलिसांना मिळून आली असून या चिठ्ठीत कर्ज परत करण्यासाठी तगादा लावणाऱ्याची नावे लिहून कर्जबाजारी झाल्यामुळे आत्महत्या करीत असल्याचे म्हटले आहे. याप्रकरणी गोवंडी पोलिसांनी अपमृत्युची नोंद केली असून अधिक तपास करण्यात येत असल्याची माहिती पोलिसानी दिली.

 

हे ही वाचा:

अमरावतीमध्ये इंटरनेट सेवा पूर्ववत, पण संचारबंदी कायम

भाजपाने जाहीर केले विधान परिषद निवडणुकीचे उमेदवार

भारतीय नौदलाला मिळणार नवी ‘शक्ती’

…म्हणून विक्रम गोखले माध्यमांवर भडकले

 

राठोड यांच्याजवळ सापडलेल्या चिठ्ठीत एकूण १० राजकीय नेत्यांनी नावे लिहून ठेवली आहे. राठोड यांनी या नेत्यांमुळेच आत्महत्या केल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला आहे. गुरुवारी गोवंडी पोलिस ठाण्यात नातेवाईकांनी एकत्र येऊन जबाबदार असलेल्या नेत्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

Exit mobile version