समाजवादी पक्षाचे आमदार तसेच त्यांच्या मुलांनी घातला ४५ लाखांचा गंडा

पासी यांनी दाखवलेल्या बनावट कागदपत्रांवर विश्वास ठेवून ४५ लाख रुपये वळते

समाजवादी पक्षाचे आमदार तसेच त्यांच्या मुलांनी घातला ४५ लाखांचा गंडा

कॉफी शॉप उघडण्याच्या नावाने उत्तर प्रदेशस्थित व्यावसायिकाची ४५ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी उत्तर प्रदेशमधील समाजवादी पक्षाचे आमदार सुभाष पासी आणि त्यांची दोन मुले निखिल व राहुल यांच्यावर वर्सोवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शशिकांत मिश्रा यांनी पासी यांच्याविरोधात एफआयआर दाखल केला आहे. पासी याने ते स्वत: गाझियापूरचे आमदार असल्याचे सांगितले होते. तसेच, कॉफी शॉपमध्ये खूप फायदा असल्याचे सांगत त्यात गुंतवणूक करण्याविषयी सुचवले होते. ‘पासी यांनी मिश्रा याला वर्सोवा येथे एक जागा दाखवली होती. ही जागा त्यांनी चौहान नावाच्या व्यक्तीकडून मे २०२१ ते एप्रिल २०२६ या पाच वर्षांसाठी भाडेतत्त्वावर घेतल्याचे सांगितले होते. तसेच, त्याने काही बनावट कागदपत्रे दाखवून या व्यवसायात गुंतवणूक करण्यास भाग पाडले.

पासी यांनी मिश्रा याला ते येथे ‘हेझ कॅफे अँड बार’ उघडत असल्याचे सांगत त्यात ४५ लाख गुंतवल्यास ५० टक्के भागिदारीचा प्रस्ताव दिला होता. गुंतवलेली रक्कम परत देण्याचेही आश्वासन त्यांनी दिले होते. पासी यांनी दाखवलेल्या बनावट कागदपत्रांवर विश्वास ठेवून मिश्रा आणि त्यांचे मित्र अरविंद सिंग याने पासी यांच्या खात्यावर ४५ लाख रुपये वळते केले. ११ फेब्रुवारी रोजी सिंग याने पासी आणि त्याच्या दोन मुलांशी नोंदणी करारही केला. मात्र काही महिने उलटूनही कॉफी शॉप सुरू होऊ शकले नाही.

हे ही वाचा:

‘केरळ स्टोरी’तील १० प्रसंग कापले, चित्रपटाला ‘ए’ सर्टिफिकेट

लुधियानाच्या वायूगळतीने घेतला तीन हुशार मुलांचा घास

प्रतिभा पवार का हसत होत्या ? सुप्रिया सुळे का बोलल्या नाहीत ?

भिवंडीतून गायब झालेले बाळ सापडले झारखंडमध्ये

यासंदर्भात विचारणा केल्यावर काही परवानग्या बाकी असल्याचे पासी यांनी सांगितले होते. असेच काही महिने उलटले. त्या जागेचा मालक आणि पासी यांच्यातील करार संपुष्टात आला असून ही जागा मालकाने पासी यांच्याकडून परत घेतली असल्याचे मिश्रा यांना समजले. त्यामुळे धक्का बसलेल्या मिश्रा यांनी पोलिसात धाव घेऊन पासी आणि त्यांच्या दोन मुलांविरोधात तक्रार दाखल केली.   सन २०१७मध्येही अंधेरीतील चकाला येथील एसआरएचे घर विकण्याच्या बहाण्याने मुंबई पोलिस अधिकाऱ्याची २२.९ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी पासी आणि त्यांच्या सेक्रेटरीवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Exit mobile version