घाटकोपर येथील रेल्वे पोलिसांच्या जागेवर असलेल्या महाकाय होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी विशेष तपास पथकाने ‘स्ट्रक्चर कन्सल्टंट’मनोज रामकृष्ण याला गुरुवारी अटक केली आहे.
शुक्रवारी रामकृष्ण याला किल्ला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. दरम्यान इगो मीडियाचा मालक भावेश भिंडेची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
घाटकोपर पूर्व येथे असलेल्या लोहमार्ग पोलीसांच्या जागेवर असलेल्या महाकाय बेकायदेशीर होर्डिंग १३ मे रोजी पेट्रोल पंपावर कोसळून १७ जणांचा बळी गेला होता आणि जवळपास ८० जण जखमी झाले होते. या प्रकरणी पंतनगर पोलीस ठाण्यात होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी इगो मीडिया या कंपनीचे मालक भावेश भिंडेसह संचालक, तसेच संबंधित अधिकारी कर्मचारी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करून या तपासासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) गठीत करण्यात आली आहे.विशेष तपास पथकाने या प्रकरणात भावेश भिंडे याला १६ मे रोजी उदयपूर येथून अटक केली, भावेश भिंडे याची गुरुवारी पोलीस कोठडी संपली.त्याला गुरुवारी किल्ला न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
दरम्यान, विशेष तपास पथकाने याप्रकरणात गुरूवारी या दुर्घटनेप्रकरणी स्ट्रक्चर कन्सल्टंट’ मनोज रामकृष्ण याला अटक करण्यात आली आहे.
हे ही वाचा:
पंतप्रधान नरेंद्र मोदी ४५ तास ध्यानधारणेत
मोदींसोबत, केतकरांनाही हॅट्ट्रिकची संधी…
कारसेवक देवेंद्र फडणवीस यांनी अयोध्येत घेतले रामललांचे दर्शन!
ड्रायव्हर बनला सीबीआय अधिकारी, केली फसवणूक!
मनोज रामकृष्ण यांनी दुर्घटनाग्रस्त बेकायदेशीर होर्डिंगला ‘स्ट्रक्चर स्टेबीलिटी’ प्रमाणपत्र दिले होते. मनोज रामकृष्ण हे मुंबई महानगर पालिकेच्या पॅनलवर असून त्यांनी या दुर्घटनाग्रस्त होर्डिंगला ८०×८० फुटांचे ‘स्ट्रक्चर स्टेबीलिटी’ प्रमाणपत्र दिले होते, मुळात हे होर्डिंग १२०×१४० होते,व ते बेकायदेशीर होते, तसेच त्यांचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे होते असे विशेष पथकाच्या तपासात समोर आले.
मनोज रामकृष्ण याची या दुर्घटनेतील दुसरी अटक आहे. शुक्रवारी त्याला किल्ला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. इगो मीडिया प्रा.लिमिटेड या कंपनीची संचालक असलेल्या जान्हवी मराठे या फरार असून विशेष तपास पथकाकडून त्यांचा कसून शोध घेण्यात येत आहे.होर्डिंग दुर्घटना प्रकरणात विशेष पथकाकडून लोहमार्ग पोलीस दलाचे सहाय्यक पोलीस आयुक्त शहाजी निकम तसेच इगो मीडिया कंपनीचे अधिकारी कर्मचारी यांचे जबाब नोंदविण्यात आले आहे.