काल, १६ एप्रिल रोजी देशात हनुमान जयंतीचा उत्सव साजरा करण्यात आला. मात्र दिल्लीत हनुमान जयंतीनिमित्त काढलेल्या शोभायात्रेवेळी दोन गटांत हिंसाचार उसळल्याने खळबळ उडाली आहे. दिल्लीतील जहांगीरपुरी भागात ही घटना घडली असून दगडफेकीत अनेकजण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये काही पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचाही समावेश असून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दिल्लीतील जहांगीरपुरी भागात काल हनुमान जयंतीनिमित्त शोभायात्रा काढण्यात आली होती. या शोभायात्रेला मोठी गर्दी होती. त्यावेळी शोभायात्रा सुरु असताना अचानक दोन समुदाय समोरासमोर आल्याने वाद झाला. हा वाद एवढा चिघळला की, दगडफेक आणि जाळपोळ सुरु झाली. जमावाकडून झालेल्या दगडफेकीत अनेकजण जखमी झाले आहेत. त्यात काही पोलीस कर्मचारी आणि अधिकारीही जखमी झाले असून सर्वांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी या प्रकरणी ९ जणांना अटक केली असून १५ जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणीचा तपास करण्यासाठी आता १० पथके तयार करण्यात आली आहेत.
काही वेळात पोलिसांनी हस्तक्षेप करत स्थिती नियंत्रणात आणली. खबरदारी म्हणून या भागात सध्या पोलिसांचा अतिरिक्त फौज तैनात करण्यात आली आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारीही घटनास्थळी दाखल झाले असून आरोपींवर कठोर कारवाईसाठी पावले उचलण्यात येत आहेत.
हे ही वाचा:
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले १०८ फुटी हनुमान पुतळ्याचे उद्घाटन
माटुंगा येथील रेल्वे अपघाताचे कारण आले समोर
एमआयएमचा पदाधिकारी बायकोसोबत करणार हिंदू धर्मात प्रवेश
तसेच दिल्लीत झालेल्या हिंसाचाराची खबरदारी म्हणून उत्तर प्रदेश आणि दिल्लीच्या सीमांलगत असलेल्या राज्यांना हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान, रामनवमी दिवशीही देशातील अनेक राज्यांत हिंसाचाराच्या घटना घडल्या होत्या. शोभायात्रांदरम्यान होणाऱ्या दगडफेक व जाळपोळीच्या घटनांमुळे देशात तणाव निर्माण झाला आहे.