महाराष्ट्र राज्याचे पणन सहसंचालक शशिकांत पतंगराव घोरपडे (वय ४८) हे बुधवार, १२ ऑक्टोबरपासून बेपत्ता आहेत. या प्रकरणी सातारा जिल्ह्यातील शिरवळ पोलीस स्टेशनमध्ये बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. शशिकांत घोरपडे हे बेपत्ता झाले असून त्यांनी भोर तालुक्यातील सारोळा येथील निरा नदीमध्ये उडी मारल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांकडून युद्धपातळीवर शोधकार्य सुरू आहे.
शशिकांत घोरपडे हे बुधवारी दुपारी त्यांच्या पुणे येथील कार्यालयातून बाहेर निघाले होते. मात्र, बराच वेळ होऊनही ते घरी गेले नाहीत म्हणून त्यांच्या कुटुंबीयांनी आणि नातेवाईकांनी त्यांचा शोध सुरू केला. दरम्यान त्यांची गाडी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास टोलनाका पास करून साताराच्या दिशेने गेल्याची माहिती मिळाली. त्यानंतर त्यांच्या मोबाईलचे लोकेशन पाहिले असता शेवटचे लोकेशन सारोळा निरा नदीपुलाजवळ असल्याचे लक्षात आले. तसेच घोरपडे यांच्याकडे असलेली त्यांच्या मित्राची गाडीदेखील ब्रिजजवळ असलेल्या हॉटेल समोर मिळाली. त्यानुसार घोरपडे यांचे बंधू श्रीकांत घोरपडे यांनी शिरवळ पोलिस ठाण्यात बेपत्ता होण्याची तक्रार नोंदवली आहे.
हे ही वाचा:
आमिरवर जाहिरातीतून धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप
चीनमध्ये शी जिनपिंग यांच्या विरोधात बॅनर झळकले
काश्मीर मुद्द्यावर टिपण्णी करणाऱ्या पाकिस्तानला भारताने फटकारले
मुंबई, दिल्लीत दहशतवादविरोधी बैठक
शिरवळ येथील नीरा नदीच्या पात्रालगत एका हॉटेलपासून एक व्यक्ती चालत पूलाकडे जात असल्याचे दिसून आले असून नेमक्या कोणत्या व्यक्तीने नदीपात्रात उडी मारली आहे, हे स्पष्ट झालेले नाही. शशिकांत घोरपडे यांचा तपास सुरू करण्यात आला आहे. निरा नदी पात्रात भोर येथील भोईराज जल आपत्ती निवारण पथक, महाबळेश्वर ट्रेकर्स, सातारा पोलिस आणि राजगड पोलिसांनी युध्द पातळीवर शोध मोहीम चालू केली आहे.