मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांचे अखेर निलंबन झाले आहे. राज्य सरकारने त्यांच्याविरोधातील निलंबनाची कारवाई सुरू केली होती. मुख्यमंत्र्यांचीही त्यांच्या निलंबनाच्या कागदपत्रांवर स्वाक्षरी झाली होती. २ डिसेंबरला तसे पत्र राज्याच्या गृहमंत्रालयाकडून देण्यात आले आहे. या निलंबनाच्या कालावधीत परमबीर यांना सर्व भत्ते नियमानुसार देण्यात येणार आहेत. तसेच वेगवेगळ्या अटींचे पालन करावे लागणार आहे.
गृहमंत्रालयाने दिलेल्या या पत्रात नमूद करण्यात आले आहे की, परमबीर सिंग यांना या तारखेपासून (२ डिसेंबर २०२१) पासून निलंबित करण्यात आले असून त्यांच्या कामात असलेल्या अनेक त्रुटी, चालढकल, गैरप्रकार या कारणांमुळे हे निलंबन केले जात आहे. कर्तव्यावर कोणतेही ठोस कारण न देता अनुपस्थित राहण्याचा ठपकाही त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
हे ही वाचा:
मिर्झापूरच्या ललितचा मृतदेह आढळला
वरळी सिलेंडर स्फोट हलगर्जीपणाबद्दल भाजपा आरोग्य समिती सदस्यांचा राजीनामा
शिंझो आबे यांनी दिला चीनला ‘हा’ इशारा
धक्कादायक!! मुलीचे अपहरण नव्हे तर आईनेच केली हत्या!
या पत्रात परमबीर यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्यांची माहितीही देण्यात आली आहे. त्यानुसार कोपरी, कल्याण, मरीन ड्राइव्ह, बाजारपेठ पोलिस स्टेशन ठाणे, ठाणे नगर पोलिस स्टेशन येथे दाखल केलेल्या गुन्ह्यांची माहिती देण्यात आली आहे.
या पत्रात असेही नमूद केले आहे की, अखिल भारतीय सेवा नियमांतील क्रमांक चार नुसार त्यांना सर्व भत्ते दिले जातील. पण त्यासाठी ते अन्यत्र कुठेही नोकरी, व्यवसाय करत नसल्याचे पत्र त्यांनी गृहमंत्रालयाला द्यावे लागेल. पोलिस महासंचालकांच्या परवानगीशिवाय, त्यांना पोलिस मुख्यालयातून कुठेही जाता येणार नाही. शिवाय, कोणतीही खासगी नोकरी, कोणताही व्यवसाय त्यांना निलंबनाच्या कालावधीत स्वीकारता येणार नाही. या नियमांचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल.
अपर पोलीस अधीक्षक मणेरेही निलंबित
परमबीर यांच्यासोबत अपर पोलीस अधीक्षक पराग श्याम मणेरे यांच्यावरही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. कल्याण, बाजारपेठ पोलिस स्टेशनमध्ये त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल आहे. गुन्हा दाखल असल्यामुळे त्यांच्याविरोधात निलंबनाची कारवाई करण्यात येत आहे.