गेल्या सात दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे. मात्र, अद्याप त्यावर कोणताही तोडगा निघालेला नाही. सरकारने मात्र कठोर भूमिका घेत संपावर गेलेल्या कर्मचाऱ्यांना सेवेतून बडतर्फ केले आहे. दरम्यान कोल्हापूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. कारवाईच्या भीतीने एसटी कर्मचाऱ्याचा हृदय विकाराने मृत्यू झाला आहे. अनिल मारुती कांबळे असे मृत कर्मचाऱ्याचे नाव आहे.
अनिल कांबळे हे मूळचे कोल्हापूर जिल्ह्यातील मडीलगे गावचे रहिवासी आहेत. २०१५ साली कांबळे हे एसटीच्या सेवेत रुजू झाले होते. सावंतवाडी आगारात चालक म्हणून ते सेवा देत होते. एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु असल्याने ते त्यांच्या मूळ गावी आले होते. गेल्या दोन दिवसात राज्य शासनाने कामावर रुजू न होणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याचे सत्र सुरू केले आहे. त्यामुळे कारवाईच्या भीतीने त्यांना हृदय विकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला असल्याचा आरोप मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांनी केला आहे.
हे ही वाचा:
… म्हणून राजधानीत लागणार लॉकडाऊन
नक्षलवादी मिलिंद तेलतुंबडेचा खात्मा?
पद्म पुरस्कारावरून काँग्रेस नेत्याने केली पंतप्रधान मोदींची स्तुती
‘…म्हणून उद्धव ठाकरे यांना रझा अकादमीच्या नेत्यांनी दिली होती फुले!’
कारवाईच्या भीतीने या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याचा आरोप होत असताना एसटी विभागाने त्यावर स्पष्टीकरण दिले आहे. अनिल मारुती कांबळे यांचं हृदयविकाराच्या झटक्याने आपल्या राहत्या गावी गारगोटी येथे दुःखद निधन झाले आहे. सरदारची घटना सावंतवाडी आगाराचे स्थानक प्रमुख श्री विशाल शेवाळे यांनी फोन द्वारे कळवली आहे. सदर चालकाचे एसटी महामंडळाने निलंबन केले नाही. काही लोक संबंधित मृत्यू एसटीच्या संपाशी जोडत आहेत. संपाशी आणि या मृत्यूचा काही संबंध नाही असे स्पष्टीकरण एसटीकडून देण्यात आले आहे.
पालघर जिल्ह्यातील जव्हार बस डेपोतील एका बस वाहकानेही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. दीपक खोरगडे (३०) असे बस वाहकाचे नाव असून खोरगडे यांनी विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. कमी पगार तसेच पगारात वाढ होत नसल्यामुळे नैराश्येत खोरगडे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. प्रकृती नाजूक असल्यामुळे आता त्यांच्यावर नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.