गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असून त्यावर अजूनही कोणताही तोडगा निघालेला नाही. दरम्यान एसटी कर्मचाऱ्यांचे आत्महत्या सत्र सुरूच आहे. संपामुळे नाशिक जिल्ह्यातील पेठ आगारातील बस चालकाने आत्महत्या केल्याचे प्रकरण समोर आले आहे. गहनीनाथ गायकवाड (वय २३) असे या चालकाचे नाव असून त्यांनी शनिवारी (२० नोव्हेंबर) राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.
पेठ आगारात सेवा देणारे गायकवाड हे मूळ बीड जिल्ह्यामधील असून सध्या पेठमधील सुलभानगर भागात वास्तव्यास होते. संपाच्या सुरुवातीपासूनच ते सहकारी कर्मचाऱ्यांसोबत संपात सहभागी झाले होते. गहनीनाथ गायकवाड हे आर्थिक समस्येत होते. आज त्यांच्या घरचा गॅस संपल्याचे समजताच आर्थिक विवंचनेत त्यांनी घरातील खोलीत जाऊन दार बंद करून गळफास घेत आत्महत्या केली. त्यावेळी त्यांची पत्नी आणि मुले बाहेरील खोलीत होते.
हे ही वाचा:
आनंद महिंद्रना बुटांच्या स्टार्टअपचा ‘आशय’ भावला!
३९ हजार झाडांची कत्तल करण्याची कशी दिली परवानगी? आदित्य ठाकरेंना सवाल
…आणि महिला वनरक्षकाला वाघाने ओढत नेले जंगलात
‘एसटी महिला कर्मचारी अनिल परबांची साडी चोळी नारळाने ओटी भरतील’
कोरोना महामारीच्या पूर्वीपासूनच आर्थिक कोंडीत अडकलेल्या एसटी महामंडळाची अवस्था बिकट असून कर्मचाऱ्यांना त्यांचे वेतनही वेळेवर मिळत नाही. एसटीचे शासनात विलिनीकरण व्हावे यासाठी सर्व एसटी कर्मचारी ठाम असून ही मागणी पूर्ण होणार नाही तोपर्यंत संप मागे घेणार नसल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले आहे. मुंबईतील आझाद मैदानावर सध्या एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. आतापर्यंत ३० हून अधिक एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.