सोलापूर जिल्ह्यामधील बार्शी तालुक्यातील भातंबरे येथे एका महाराष्ट्र राज्य राखीव दलाच्या (एसआरपीएफ) पोलिसाने स्वतःच्या शासकीय पिस्तूलमधून चारवेळा गोळीबार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमध्ये एकाचा मृत्यू झाला आहे तर दोन जण जखमी झाले आहेत. ही घटना रात्री पावणे अकराच्या सुमारस घडली आहे. वैराग पोलीस ठाण्यात संबंधित पोलीसाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एसआरपीएफ मुंबई येथे पोलीस म्हणून कार्यरत असलेल्या गुरुबा तुकाराम महात्मे या पोलिसाने गोळीबार केला. गुरुबा आणि त्याच्या पत्नीचे भांडण झाले होते. चारित्र्याच्या संशयावरून या दाम्पात्यामध्ये वाद सुरू होते. वाद मिटवण्यासाठी आणि बहिणीला घरी घेऊन येण्यासाठी काशिनाथ काळे हे त्यांचे मित्र नितीन भोसकर आणि जालिंदर काळे यांच्यासोबत भातंबरे येथे पोहचले. त्यावेळी घटनास्थळी कुटुंबातील सदस्य उपस्थित होते. बहिणीला मी तुला घेऊन जातो असे म्हणताच गुरुबा या पोलिसाने स्वतःकडील शासकीय पिस्तुलाने गोळीबार केला.
हे ही वाचा:
सोशल मीडियामध्ये येणार नवे ‘ट्रम्प’कार्ड
अभिमानास्पद! १०० कोटी लसीकरण पूर्ण
लसीकरणाच्या ऐतिहासिक क्षणाला १०० वारसा स्थळांना चढणार तिरंग्याचा साज!
गोळीबारात नितीन भोसकर आणि एकाला गोळी लागली आणि ते जखमी झाले, तर काशिनाथ काळे आणि जालिंदर काळे पळून जात असताना त्यांच्यावर गोळीबार केला. सुदैवाने ते दोघेही बचावले. नितीन भोसकर यांचा या हल्ल्यात मृत्यू झाला तर जखमी व्यक्तीवर सोलापूरमधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी गुरुबा या पोलिसाला अटक केली असून त्याच्याकडून पिस्तुल जप्त करण्यात आले आहे. पोलीस या प्रकरणात पुढील तपास करत आहेत.